IND vs AUS : टीम इंडिया सरस की ऑस्ट्रेलिया वरचढ? वनडे-आयसीसी स्पर्धेत कोण भारी?
India vs Australia Odi Head To Head : टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात वनडे क्रिकेटमध्ये भारी कोण? दोन्ही संघांनी एकमेकांविरुद्ध किती सामने खेळले आणि किती जिंकले? जाणून घ्या आकडेवारी.

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील उपांत्य फेरीत 2023 वनडे वर्ल्ड कप फायनलिस्ट टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया आमनेसामने असणार आहे. उभयसंघातील हा सामना मंगळवारी 4 मार्च रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे. टीम इंडियाने साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात न्यूझीलंडचा धुव्वा उडवत पराभवाचा वचपा काढला. त्यानंतर आता टीम इंडियाचा निशाण्यावर कांगारुं आहेत. कांगारुंना लोळवत वनडे वर्ल्ड कप फायनल 2023 पराभवाचा वचपा काढण्याचा प्रयत्न रोहितसेनेचा असणार आहे. आयसीसी स्पर्धेत दोन्ही संघांची एकमेकांविरुद्ध कामगिरी कशी राहिलीय? हे आपण जाणून घेऊयात.
टीम इंडियाने अवघ्या काही महिन्यांपूर्वी टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेत कांगारुंचा धुव्वा उडवत पराभवाची परतफेड केली होती. मात्र भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या मनात अजूनही वनडे वर्ल्ड कप फायनल पराभवाची सल कायम आहे. त्यामुळे या कांगारुंना पुन्हा एकदा चितपट करत टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला मायदेशी पाठवावं, अशी आशा क्रिकेट चाहत्यांना असणार आहे.
15 महिन्यांनी आमनेसामने
दोन्ही संघ एकदिवसीय क्रिकेटमध्ये वनडे वर्ल्ड कप 2023 फायनलनंतर आमेनसामने असणार आहेत. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दोन्ही संघ चॅम्पियन्स ट्रॉफीत एकूण 4 वेळा एकमेकांविरुद्ध भिडले आहेत. टीम इंडियाने या 4 पैकी 2 सामन्यात विजय मिळवला आहे. कांगारुंनी एकदा पलटवार करत विजय मिळवला आहे. तर एका सामन्याचा निकाल लागू शकला नाही.
एकदिवसीय क्रिकेटमधील आकडेवारी
तसेच टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात आतापर्यंत एकूण 151 एकदिवसीय सामने खेळवण्यात आले आहेत.ऑस्ट्रेलियाने यापैकी सर्वाधिक 84 सामन्यांत विजय मिळवला. टीम इंडियाने 57 वेळा कांगारुंना लोळवलंय. तर 10 सामन्यांचा निकाल लागू शकलेला नाही. त्यामुळे आता उपांत्य फेरीत कोण विजय होणार? हे काही तासांनी स्पष्ट होईलच, मात्र उभयसंघात या सामन्यात रस्सीखेच पाहायला मिळणार, हे मात्र नक्की.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, ऋषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती आणि अर्शदीप सिंग
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियाचा सुधारित संघ : स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), सीन अॅबॉट, अॅलेक्स केरी, कूपर कॉनोली, बेन द्वारशुइस, नॅथन एलिस, जेक फ्रेझर-मॅकगर्क, आरोन हार्डी, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, स्पेन्सर जॉन्सन, मार्नस लाबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, तन्वीर संघा आणि अॅडम झॅम्पा.
