
अंडर 19 वनडे वर्ल्डकप स्पर्धा झिम्बाब्वे आणि नामिबियामध्ये होत आहेत. या स्पर्धतील साखळी फेरीत सामने जवळपास संपले असून एखाद दुसरा सामना शिल्लक आहे. या स्पर्धेत एकूण 16 संघांनी भाग घेतला होता आणि त्यांची चार गटात विभागणी केली होती. आता प्रत्येक गटातील तीन संघ पुढच्या फेरीत जाणार आहे. सुपर 6 फेरीत एकूण 12 संघ खेळणार आहेत. यात अ आणि ड गट मिळून एक गट, तर ब आणि क मिळून दुसरा गट तयार केला जाईल. भारतीय संघ गट ब मध्ये आहे, तर पाकिस्तानी संघ गट क मध्ये आहे. त्यामुळे दोन्ही संघ एकाच सुपर 6 मध्ये एकाच गटात असतील. पण एकाच गटात असले तरी भारत विरुद्ध पाकिस्तान सामना होईल की नाही? असा प्रश्न आहे.. यासाठी आणखी एक गणित सुटावं लागणार आहे. कारण सुपर 6 मधील संघ एकमेकांशी खेळतील. दुसऱ्या गटातील समान क्रमांकाच्या संघाचा सामना करावा लागणार नाही.
अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तानने साखळी फेरीतील सर्व सामने खेळले आहेत. त्यांच्या गटात ते दुसऱ्या क्रमांकावर आहेत. आता भारतीय संघ आपल्या गटात दुसऱ्या क्रमांकावर असेल तर भारत पाकिस्तान सामना होणार नाही. पण पहिल्या किंवा तिसऱ्या क्रमांकावर राहिला तर मात्र भारता पाकिस्तान सामना होऊ शकतो. भारताचा संघ सध्या ब गटात अव्वल स्थानी आहे. तर न्यूझीलंडचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे. शनिवारी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सामना होणार आहे. या सामन्यातील विजयी संघ पहिलं स्थान गाठेल. त्यामुळे भारताने हा सामना जिंकला तर अव्वल स्थान गाठेल आणि पाकिस्तानशी सामना होईल. पण तसंच झालं नाही तर दुसऱ्या स्थानी राहील आणि पाकिस्तानशी सामना होणार नाही.
भारताने आतापर्यंत साखळी फेरीतील दोन सामने खेळले आहे. यात बांग्लादेश आणि अमेरिकेला पराभवाची धूळ चारली आणि गटात पहिलं स्थान गाठलं आहे. न्यूझीलंडचा शेवटचा सामना भारताशी होणार आहे. दरम्यान, न्यूजीलंडने दोन सामने खेळले असून एका सामन्यात पराभव झाला आहे. या गटातून तीन संघ पुढच्या फेरीत जाणार असल्याने अमेरिका बाद होण्याची शक्यता वाढली आहे.