Cricket : टीम इंडियाकडून विजयानंतरही धावा करणं सुरुच, अंपायरनेही थांबवलं नाही, कारण काय?

India Women vs ECB Development Womens XI Match Result and Highlight: स्मृती मंधाना हीच्या नेतृत्वात वुमन्स इंडिया टीमने इंग्लंड विरुद्ध सराव सामन्यात विजय मिळवला. टीम इंडियाने या सामन्यात लक्ष्याचा पाठलाग करताना गरजेपेक्षा अधिक 45 धावा केल्या.

Cricket : टीम इंडियाकडून विजयानंतरही धावा करणं सुरुच, अंपायरनेही थांबवलं नाही, कारण काय?
Smriti Mandhana and Shafali Verma
Image Credit source: PTI
| Updated on: May 25, 2026 | 8:59 PM

भारतात आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील साखळी फेरीनंतर क्रिकेट चाहत्यांना प्लेऑफचं वेध लागले आहेत. तर दुसऱ्या बाजूला वुमन्स टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर आहे. टीम इंडिया यजमान इंग्लंड वुमन्स विरुद्ध या दौऱ्यात टी 20i मालिका खेळणार आहे. या मालिकेत उभयसंघांमध्ये एकूण 3 सामन्यांचा थरार रंगणार आहे. त्यानंतर 12 जूनपासून आगामी आयसीसी टी 20i वर्ल्ड कप स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे टीम इंडिया आणि इंग्लंडसाठी टी 20i मालिका अतिशय महत्त्वाची आहे. त्याआधी टीम इंडियाने इंग्लंडमध्ये पोहचताच विजयी सलामी दिली आहे.

वुमन्स टीम इंडियाने सराव सामन्यात इसीबी डेव्हलपमेंट वुमन्स ईलेव्हन टीमवर जबरदस्त असा विजय साकारला आहे. टीम इंडियाने या सराव सामन्यात 7 विकेट्सने विजय मिळवला. या 20 षटकांच्या सामन्याचं आयोजन हे चेल्म्सफोर्डमधील अँबेसडर क्रूझ लाईन मैदानात करण्यात आलं होतं. टीम इंडियाच्या महिला ब्रिगेडने या सामन्यात बॅटिंग आणि त्याआधी बॉलिंगने जबरदस्त कामगिरी केली आणि चाहत्यांची मनं जिंकली. विशेष बाब म्हणजे टीम इंडियाने विजयी आव्हानापेक्षा अधिक धावा केल्या.

टीम इंडियाकडून 45 धावा जास्त

क्रिकेटमध्ये साधारणपणे विजयी धावा पूर्ण केल्यानंतर सामना संपतो. मात्र या सामन्यात तसं झालं नाही. टीम इंडियाने लक्ष्य पूर्ण केल्यानंतरही अतिरिक्त 45 धावा केल्या. कमाल म्हणजे अंपायरनेही थांबवलं नाही. अंपायरने टीम इंडियाला का थांबवलं नाही? हे सविस्तर जाणून घेऊयात. तसेच या सामन्याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.

इंडियाच्या बॉलिंगसमोर इसीबी डेव्हलपमेंट टीमला 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 154 धावांपर्यंतच मजल मारता आली. यजमान संघासाठी फ्लोरेंस मिलर हीने सर्वाधिक 48 आणि जोआन गार्डनर हीने 36 धावांचं योगदान दिलं. कॅप्टन सोफिया स्मेन हीने नाबाद 27 धावा केल्या. तर टीम इंडियासाठी अरुंधती रेड्डी हीने सर्वाधिक 3 विकेट्स मिळवल्या. तर दीप्ती शर्मा आणि श्रेयांका पाटील या दोघींनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.

टीम इंडियाचा विजय

टीम इंडियाने 155 धावांचं आव्हान हे 3 विकेट्सच्या मोबदल्यात 16.2 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. मात्र टीम इंडियाने विजयानंतरही धावा करणं सुरुच ठेवलं. सराव सामना असल्याने पंचानीही रोखलं नाही. खेळाडूंना जास्तीत जास्त खेळता यावं या निमित्ताने सराव सामन्यांचं आयोजन केलं जातं. त्यामुळे हा सामना संपूर्ण 20 ओव्हर खेळवण्यात आला. टीम इंडियाने संपूर्ण 20 ओव्हरमध्ये 200 धावा केल्या. टीम इंडियाने अशाप्रकारे 45 धावा जास्त केल्या.

लेडी सेहवागचं अर्धशतक

टीम इंडियासाठी लेडी सेहवाग अर्थात शफाली वर्मा हीने सर्वाधिक 50 धावा केल्या. शफाली त्यानंतर रिटायर्ड हर्ट होऊन मैदानाबाहेर गेली. कॅप्टन स्मृती मंधाना हीने 21, यास्तिका भाटीया हीने 47 आणि भारती फुलमाळीने 48 धावांचं योगदान दिलं. तर अरुंधती रेड्डीने 20 धावा केल्या.

Follow Us