मुंबई: भारतीय क्रिकेट संघातील गब्बर म्हणजे शिखर धवन (Shikhar Dhawan) लवकरच बॉलिवूडमध्ये डेब्यू (Bollywood debu) करणार असल्याच्या बातम्या आहेत. सध्या शिखर धवन आयपीएलमध्ये (IPL) खेळतोय. पंजाब किंग्सचा तो प्रमुख आधारस्तंभ आहे. आयपीएलच्या यंदाच्या सीजनमध्ये तो आपल्या लौकीकाला साजेसा खेळ दाखवतोय. मुख्य प्रवाहातील एका मोठ्या सिनेमातून शिखर बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झाल्याचा अंदाज आहे. या चित्रपटाबद्दलची सर्व माहिती अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे. “शिखरच्या मनात कलाकारांबद्दल नेहमीच आदराची भावना आहे. त्याला जेव्हा रोल ऑफर केला गेला, तेव्हा त्याने तो आनंदाने स्वीकारला. चित्रपटाच्या निर्मात्यांना शिखर त्या भूमिकेसाठी परफेक्ट वाटला. काही महिन्यांपूर्वी त्यांनी शिखरशी या बद्दल संपर्क साधला. शिखरला एक चांगला व्यवस्थित रोल मिळाला आहे. त्याची महत्त्वाची भूमिका या चित्रपटात आहे. या वर्षी हा चित्रपट रिलीज होऊ शकतो” पिंकव्हिलाने सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिलं आहे.
शिखरला भारतीय चित्रपट प्रचंड आवडतात. जानेवारी महिन्यात त्याने इन्स्टाग्रामवर एक रिल पोस्ट केली होती. त्यात तो पुष्पा चित्रपटातील डायलॉग बोलताना दिसला. अल्लू अर्जुनच्या चित्रपटातील डायलॉग शिखर खूप सहज आणि सुंदर पद्धतीने बोलला. पुष्पा चित्रपटाने जवळपास 300 कोटींची कमाई केली आहे.
View this post on Instagram
डिसेंबर 2021 मध्ये शिखरने अभिनेता रणवीर सिंह सोबतचा एक फोटो पोस्ट केला होता. त्यात शिखरने ’83’ चित्रपटात कपिल देवची भूमिका साकारणाऱ्या रणवीरला शुभेच्छा दिल्या होत्या. भारताने पहिला क्रिकेट वर्ल्ड कप 1983 मध्ये जिंकला. त्यावर हा चित्रपट आधारीत होता.
View this post on Instagram
सध्या सुरु असलेल्या आयपीएलमध्ये शिखर खोऱ्याने धावा करतोय. ऑरेंज कॅपच्या शर्यतीत तो चौथ्या स्थानावर आहे. आतापर्यंत त्याने 421 धावा फटकावल्या आहेत. 88 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या असून तीन अर्धशतक आहेत. पंजाब किंग्सचा लीगमधील शेवटचा सामना रविवारी 22 मे रोजी खेळणार आहे.