दुनिया हिला देगे हम! मुंबईने 17 व्या मोसमातील पहिल्या विजयासह वानखडेत इतिहास रचला
Mumbai Indians : मुंबई इंडियन्से आयपीएलच्या 17 व्या मोसमात दिल्ली कॅपिट्ल्सचा धुव्वा उडवत पहिला विजय मिळवला. मुंबई इंडियन्सने या विजयासह वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे.

मुंबई इंडियन्सने रविवारी 7 एप्रिल रोजी आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 20 व्या सामन्यात दिल्ली कॅपिट्ल्सवर 29 धावांनी विजय मिळवला. दिल्लीला विजयासाठी मिळालेल्या 235 धावांचा पाठलाग करताना 205 धावांपर्यंतच मजल मारता आली. मुंबईने घरच्या मैदानात अशाप्रकारे 3 सामन्यांमधील पराभवानंतर अखेर विजयाचं खातं उघडलं. मुंबईने या विजयासह इतिहास रचला. मुंबईने टी 20 क्रिकेटमध्ये महारेकॉर्ड केला. मुंबईने टीम इंडिया आणि चेन्नई सुपर किंग्स या दोन संघांना पछाडलं.
मुंबईचा 150 वा टी 20 विजय
मुंबईने दिल्ली कॅपिट्ल्सला पराभूत करत टी 20 क्रिकेटमधील 150 वा विजय मिळवला. मुंबई टी 20 क्रिकेटमध्ये 150 सामने जिंकणारी पहिली टीम ठरली. सर्वाधिक टी 20 सामने जिंकण्याच्या यादीत चेन्नई सुपर किंग्स दुसऱ्या टीम इंडिया तिसऱ्या स्थानी आहे. चेन्नईने 148 आणि टीम इंडियाने 144 सामने जिंकले आहेत. लंकाशायर टीम या यादीत चौथ्या आणि समरसेट पाचव्या स्थानी आहे. लंकाशायरने 143 आणि समरसेटने 142 टी 20 सामने जिंकले आहेत. तर पाकिस्तान क्रिकेट टी सहाव्या स्थानी आहे. पाकिस्तानने 139 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे.
सर्वाधिक टी 20 सामने जिंकणारे संघ
पाकिस्तान – 139 समरसेट – 142 लंकाशायर – 143 टीम इंडिया – 144 चेन्नई सुपर किंग्स – 148 मुंबई इंडियन्स – 150
सामन्याचा धावता आढावा
दरम्यान मुंबई इंडियन्सची या 17 व्या हंगामातील सुरुवात सलग 3 पराभवाने झाली. मात्र त्यानंतर मुंबईने जोरदार कमबॅक केलं. दिल्ली विरुद्ध रोहित शर्मा 49 आणि रोमरियो शेफर्ड याने ठोकलेल्या 39 धावा केल्या. रोमरियोने 20 व्या ओव्हरमध्ये 32 धावा ठोकल्या. मुंबईने या जोरावर दिल्लीसमोर 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 234 धावा केल्या. दिल्लीनेही डोंगराएवढ्या आव्हानाचा जोरदार पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचे प्रयत्न अवघ्या 29 धावांनी कमी पडले.
मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन : हार्दिक पांड्या (कॅप्टन), रोहित शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टिम डेव्हिड, मोहम्मद नबी, रोमॅरियो शेफर्ड, पीयूष चावला, जेराल्ड कोएत्झी आणि जसप्रीत बुमराह.
दिल्ली कॅपिटल्स प्लेइंग ईलेव्हन : ऋषभ पंत (कॅप्टन आणि विकेटकीपर), डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ, अभिषेक पोरेल, ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, ललित यादव, झाये रिचर्डसन, एनरिक नॉर्टजे, इशांत शर्मा आणि खलील अहमद.
