IPL 2024 MI vs SRH : प्लेयर्स मैदानात येऊनही मुंबई हैदराबाद सामना सुरु होण्यास दिरंगाई, कारण…
आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात आठवा सामना सुरु आहे. हे दोन्ही संघ स्पर्धेतील दुसरा सामना खेळत आहेत. दोन्ही संघांना पहिल्या सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. त्यामुळे विजयासाठी दोन्ही संघांचा प्रयत्न असणार आहे.असं असताना या सामन्याच्या सुरुवातीला गडबड झाली आणि सामना सुरु होण्यास उशीर झाला.

आयपीएल 2024 स्पर्धेच्या आठव्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे संघ आमनेसामने आहेत. या सामन्यात नाणेफेकीचा कौल मुंबई इंडियन्सच्या बाजूने लागला. कर्णधार हार्दिक पांड्याने क्षणाचाही विलंब न करता गोलंदाजीचा निर्णय घेतला. हा सामना ठरल्या वेळेप्रमाणे संध्याकाळी 7.30 वाजता सुरु होणार होता. मात्र हा सामना सुरु होण्यास विलंब झाला. मुंबई इंडियन्सचे सर्व खेळाडू फिल्डिंगसाठी मैदानात उतरले होते. फर्स्ट स्लिपला रोहित शर्मा उभा राहिला. तसेच इतर खेळाडू ठरल्या जागेवर उभे राहिले. मात्र सामन्यास उशीर होत असल्याने खेळाडूंच्या चेहऱ्यावर संताप दिसला. खेळाडू एकमेकांशी काहीतरी पुटपुटताना दिसले. साईड स्क्रिनवर एका छोट्या निळ्या पॅचमुळे हा सामना सुरु होण्यास विलंब झाला. क्वेना माफाका बराच वेळ हातात चेंडू घेऊन आयपीएलमधील पहिला चेंडू टाकण्यासाठी प्रतिक्षा करत होता. अखेर स्क्रिनची समस्या दूर झाली आणि काही मिनिटं उशिराने सामना सुरु झाला.
दरम्यान नाणेफेकीचा कौल झाल्यानंतर कर्णधार हार्दिक पांड्या म्हणाला की, “आम्ही प्रथम गोलंदाजी करणार आहोत. खेळपट्टी चांगली दिसत आहे. मागच्या सामन्यातून आम्ही बरंच काही शिकलो आहोत. तेव्हा प्लाननुसार झालं नव्हत. त्यामुळे सामना गमवावा लागला होता. अजून 13 गेम आहेत आणि सर्वकाही ठरवलेल्या योजनांनुसार करायचं आहे. आम्ही सकारात्मक असून पुढची आव्हानं पेलण्यास तयार आहोत.”
सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्स म्हणाली की, “ही खेळपट्टी चांगली आहे. त्यामुळे जास्त काही अपसेट नाही. ही एक कठोर स्पर्धा आहे. आम्हाला होमग्राऊंडचा फायदा होईल. जानसेनच्या जागी संघात ट्रेव्हिस हेडला घेतलं आहे. तर नटराजनला डावलून उनाडकटला घेतलं आहे. आमचा संघ तगडा आहे.”
दोन्ही संघाचे खेळाडू
सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन): ट्रेव्हिस हेड, मयंक अग्रवाल, अभिषेक शर्मा, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे, जयदेव उनाडकट.
मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन): इशान किशन (विकेटकीपर), रोहित शर्मा, नमन धीर, टिळक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), टिम डेव्हिड, जेराल्ड कोएत्झी, शम्स मुलानी, पीयूष चावला, जसप्रीत बुमराह, क्वेना माफाका
