Video : गुजरात टायटन्सच्या कर्णधारपदाची माळ गळ्यात पडल्यानंतर शुबमन गिल हार्दिक पांड्याबाबत बरंच काही बोलून गेला
आयपीएल 2024 स्पर्धेपूर्वी फ्रेंचाईसीमध्ये बरीच उलथापालथ सुरु आहे. मिनी ऑक्शनपूर्वी झालेल्या ट्रेडमध्ये हार्दिक पांड्याने मुंबई इंडियन्सची कास धरली आहे. त्यामुळे गुजरात टायटन्सच्या कर्णधारपदाची माळ शुबमन गिल याच्या गळ्यात पडली आहे. पण आता शुबमन गिलच्या वत्कव्यामुळे बराच वाद होण्याची शक्यता आहे. शुबमन गिलने हार्दिक पांड्याच्या निष्ठेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याची चर्चा आहे.
मुंबई : आयपील 2024 स्पर्धेसाठी आतापासूनच तयारी सुरु झाली आहे. दोन ते तीन महिन्यात आयपीएलच्या 17 व्या पर्वाला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेपूर्वी खेळाडूंचं अदानप्रदान झालं असून हार्दिक पांड्याची डील सर्वात मोठी मानली जात आहे. मुंबई इंडियन्सने 15 कोटी रुपये खर्च करून त्याला आपल्या ताफ्यात घेतलं आहे. त्यामुळे दोन्ही संघांमध्ये बरीच धुसफूस सुरु असल्याचं दिसून येत आहे. जसप्रीत बुमराह याची क्रिप्टिक पोस्टचाही असाच काही अर्थ काढला जात आहे. त्यात आता शुबमन गिलच्या वक्तव्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात गेल्याने कर्णधारपदाची धुरा शुबमन गिलकडे आली आहे. शुबमन गिल याच्या चर्चेचा एक व्हिडीओ गुजरात टायटन्सने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. यात शुबमन गिल निष्ठेबाबत बोलताना दिसत आहे. या शब्दप्रयोगामुळे त्याचा थेट संबंध हार्दिक पांड्याशी जोडला जात आहे.
काय म्हणाला शुबमन गिल?
‘मला माहिती आहे की. कर्णधारपदासोबत बऱ्याच जबाबदाऱ्या खांद्यावर पडतात. यासाठी मेहनत घेणं गरजेचं आहे. तसेच निष्ठाही महत्त्वाची असते.’, असं शुबमन गिल त्या पोस्ट केलेल्या व्हिडीओत बोलताना दिसत आहे. गिलने निष्ठा या शब्दाचा वापर केल्याने लोकं आता हार्दिक पांड्याला ट्रोल करत आहेत. हार्दिक पांड्या आयपीएल 2022 आणि 2023 स्पर्धेत गुजरात टायटन्सचा कर्णधार होता. आता आयपीएल 2024 साठी मुंबई इंडियन्स संघात सहभागी झाला आहे.
😍 From a dreamy eyed fanboy of the IPL to a captain of the Gujarat Titans! Aapdo Shubman is raring to own his latest designation! Hear his first words from a brand new chapter… 💙#TitansFAM, ready for a new era of leadership? 💙#AavaDe pic.twitter.com/vmIN7I4LQY
— Gujarat Titans (@gujarat_titans) November 29, 2023
‘आयपीएल खेळणं प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं. मी जेव्हा 7-8 वर्षांचा होतो. तेव्हा आयपीएल सुरु झालं होतं. आता या लीगमध्ये कर्णधारपद भूषवणं मोठी गोष्ट आहे. कर्णधारपदासाठी शिस्त, कठोर मेहनत आणि निष्ठा महत्त्वाची असते. मी मोठ्या लीडर्ससोबत टीममध्ये खेळलो आहे. त्यांच्यापासून बऱ्याच गोष्टी शिकलो आहे. त्याची मदत मला आयपीएलमध्ये होईल.’, असं शुबमन गिल म्हणाला.
शुबमन गिलचं वय आता 24 वर्षे आहे. त्यामुळे त्याच्याकडे भविष्यातील टीम इंडियाचा कर्णधार म्हणून पाहिलं जात आहे. कमी वयाच्या कर्णधारासोबत खेळाडू मोकळेपणाने वागतात. अशीच स्थिती महेंद्रसिंह धोनीच्या कर्णधारपदाच्या काळात पाहिलं गेलं आहे. सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, युवराज सिंग, आशिष नेहरा, सौरव गांगुली हे खेळाडू खेळले होते.