पंजाब किंग्सचं पराभवाचं खापर या खेळाडूने स्वत:च्या माथ्यावर फोडलं, म्हणाला…
आयपीएल 2025 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने पंजाब किंग्सचा धुव्वा उडवला आणि जेतेपदावर नाव कोरलं. पंजाब किंग्सचा या सामन्यात फक्त 6 धावांनी पराभव झाला. या पराभवाची वेगवेगळी कारणं आहे. पण आठवडाभरानंतर पंजाब किंग्सच्या एका खेळाडूने पराभवाची जबाबदारी स्वीकारली आहे. अंतिम सामन्यात फक्त 15 धावांची खेळी केल्याचा पश्चातापही त्याने व्यक्त केला.

आयपीएल 2025 स्पर्धेचा विजेता ठरून आता आठवडा उलटून गेला आहे. मात्र अंतिम फेरीत पोहोचून पराभवाच्या जखमा मात्र ओल्या आहेत. 17 वर्षानंतर पंजाब किंग्सला जेतेपदाची संधी चालून आली होती. मात्र रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 6 धावांनी विजय मिळवून जेतेपदावर नाव कोरलं. त्यामुळे पंजाब किंग्सचा पहिल्यांदा जेतेपद मिळवण्याचं स्वप्न भंगलं. पंजाब किंग्स हा सामना सहज जिंकेल असं वाटत होतं. मात्र मधल्या काही षटकात सामना फिरला आणि आरसीबीच्या पारड्यात झुकला. या सामन्यात शशांक सिंह सोडून इतर कोणताही फलंदाज आपली छाप सोडू शकला नाही. नेहल वढेराकडून फॅन्सना फार अपेक्षा होत्या. पण मोक्याच्या क्षणी मोठी धावसंख्या उभारण्यास अपयशी ठरला. नेहल वढेराला या सामन्यात फक्त 15 धावा करता आल्या. एक चुकीचा फटका मारून बाद झाला. या सामन्यातील पराभवासाठी नेहल वढेराने स्वत:ला जबाबदार धरलं आहे. तसेच या पराभवाची जबाबदारी स्वीकारली आहे.
नेहल वढेराने एका मुलाखतीत सांगितलं की, ‘मी स्वत:ला दोष देईन. जर मी त्यावेळेस थोडा अधिक चांगला खेळलो असतो तर जिंकलो असतो. मी खेळपट्टीला चुकीचं बोलणार नाही. कारण याच खेळपट्टीवर आरबीने 190 धावा केल्या. मी खेळ आणखी खोलात नेण्याचा प्रयत्न करत होतो. मला जितकं समजत की सामना शेवटच्या षटकापर्यंत नेला की फिनिश करता येतो. त्याच दिवशी मी खेळ फिनिश करू शकलो नाही. यापूर्वी मी स्पर्धेत वेगाने खेळलो होतो. पण अंतिम सामन्यात या गोष्टी माझ्या बाजूने गेल्या नाहीत.’
नेहल वढेराने पुढे सांगितलं की, ‘कधी कधी तुमचा दिवस नसतो. नियमित अंतराने आम्ही विकेट गमावत असल्याने मी शेवटच्या षटकापर्यंत खेळण्याचा प्रयत्न करत होतो याचे मला वाईट वाटत नाही. पण मला वाटते की मी जलद खेळू शकलो असतो जे मी शिकलो आणि समजून घेतले आहे.’ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 20 षटकात 9 गडी गमवून 190 धावा केल्या. तसेच विजयासाठी 191 धावांचं आव्हान दिलं. या सामन्यात पंजाब किंग्सने 184 धावा केल्या. पंजाब किंग्सचा या सामन्यात 6 धावांनी पराभव झाला. नेहल वढेराने 16 सामन्यात 145 पेक्षा जास्त स्ट्राईकने 369 धावा केल्या. तसेच दोन अर्धशतकं झळकावली.
