IPL 2025 : RCB च्या विजयानंतर टॉप 4 चं चित्र स्पष्ट, मुंबईसमोर एलिमिनेटरमध्ये कुणाचं आव्हान?
IPL 2025 Playoffs Schedule : आयपीएलच्या 18 व्या हंगामातील 70 व्या सामन्यानंतर प्लेऑफमधील टॉप 2 संघ निश्चित झाले आहेत. त्यामुळे क्वालिफायर 1 मध्ये कोण खेळणार? तसेच एलिमिनेटरमध्ये कुणासमोर कुणाचं आव्हान असणार? हे स्पष्ट झालं आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने लखनौ सुपर जायंट्सवर आयपीएलच्या 18 व्या मोसमातील शेवटच्या साखळी सामन्यात धमाकेदार विजय मिळवला. आरसीबीने 228 धावांचं आव्हान हे 18.4 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून सहज पूर्ण केलं.आरसीबीचा हा या मोसमातील नववा विजय ठरला. आरसीबीच्या या विजयानंतर टॉप 4 चं चित्रही स्पष्ट झालं आहे. प्लेऑफसाठी गुजरात टायटन्स, पंजाब किंग्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि मुंबई इंडियन्स या 4 संघांनी क्वालिफाय केलं होतं. मात्र टॉप 2 साठी जोरदार चुरस होती. मात्र आरसीबी विरूद्धच्या विजयानंतर टॉप 2 चं चित्र स्पष्ट झालंय.त्यामुळे कोणता संघ कुणाविरुद्ध कधी खेळणार? हे जाणून घेऊयात.
पंजाब किंग्सने सोमवारी 26 मे रोजी मुंबईचा धुव्वा उडवत टॉप 2 मध्ये धडक दिली होती. तर पराभवामुळे मुंबई एलिमिनेटर खेळणार हे निश्चित झालं होतं. मात्र लखनौ विरुद्ध आरसीबी या सामना निर्णायक होता. या सामन्यानंतर टॉप 2 मधील एक संघ निश्चित होणार होता. लखनौ जिंकली असती तर गुजरात टॉप 2 मध्ये कायम राहिली असती. मात्र आरसीबीने लखनौचा धुव्वा उडवला आणि टॉप 2 चं तिकीट मिळवलं. त्यामुळे गुजरातला टॉप 2 मधून बाहेर व्हावं लागलं. आता एका ट्रॉफीसाठी 4 संघांमध्ये थेट चुरस असणार आहे. मात्र टॉप 2 मधील संघांना अंतिम फेरीत पोहचण्याची 1 अतिरिक्त संधी मिळणार आहे. तर एलिमिनेटरमधील संघांना अंतिम फेरीसाठी 2 सामने जिंकावे लागणार आहेत.
साखळी फेरीतील कामगिरी
पंजाब, आरसीबी आणि गुजरात या तिन्ही संघांनी साखळी फेरीत 14 पैकी प्रत्येकी 9-9 सामने जिंकले. पंजाब आणि आरसीबीला 4-4 सामन्यात पराभूत व्हावं लागलं. तसेच पंजाब आणि आरसीबीचा प्रत्येकी 1-1 सामना हा पावसामुळे रद्द करण्यात आला. पंजाब आणि आरसीबीच्या खात्यात साखळी फेरीनंतर प्रत्येकी 19 पॉइंट्स आहेत. तर गुजरातनेही 9 वेळा विजय मिळवला. मात्र गुजरातने 5 सामने गमावले. तर मुंबईला 14 पैकी 8 सामन्यांमध्येच विजय मिळवता आला.
मुंबईसमोर गुजरातचं आव्हान, पंजाब आणि आरसीबीला फायनलसाठी 1 अतिरिक्त संधी
The playoffs battles are set! 🤩
Get ready for the final frontier 🙌#TATAIPL | #LSGvRCB pic.twitter.com/hW7ocjr871
— IndianPremierLeague (@IPL) May 27, 2025
आयपीएल 2025 प्लेऑफचं वेळापत्रक
- क्वालिफायर 1, पंजाब विरुद्ध बंगळुरु, 29 मार्च
- एलिमिनेटर, गुजरात विरुद्ध मुंबई, 30 मार्च
- क्वालिफायर 2, क्वालिफायर 1 मधील पराभूत संघ विरुद्ध एलिमिनेटर विजेता संघ
- फायनल, क्वालिफायर 1 विजेता विरुद्ध क्वालिफायर 2 विजेता
स्टेडियम आणि वेळ
दरम्यान क्वालिफायर 1 आणि एलिमिनेटर सामन्यांचं आयोजन हे मुल्लानपूर, चंडीगढ येथे करण्यात आलं आहे. तर क्वालिफायर 2 आणि अंतिम सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोसदी स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे. या चारही सामन्यांना संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे.
