IPL 2026: गुजरात टायटन्सचे 16 गुण असूनही प्लेऑफमधून आऊट होण्याची शक्यता, कसं काय ते समजून घ्या

आयपीएल 2026 स्पर्धेत प्लेऑफची चुरस वाढली आहे. खरं तर अजूनही कोणत्याही संघाने प्लेऑफमध्ये जागा मिळवलेली नाही. त्यात 16 गुण असलेल्या गुजरात टायटन्सची जागाही प्लेऑफमध्ये पक्की झाली नाही. पण सध्या गुणतालिकेची स्थिती पाहता स्पर्धेतून आऊट होण्याची शक्यताही आहे.

IPL 2026: गुजरात टायटन्सचे 16 गुण असूनही प्लेऑफमधून आऊट होण्याची शक्यता, कसं काय ते समजून घ्या
IPL 2026: गुजरात टायटन्सचे 16 गुण असूनही प्लेऑफमधून आऊट होण्याची शक्यता, कसं काय ते समजून घ्या
Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: May 17, 2026 | 3:59 PM

आयपीएल 2026 स्पर्धेतील 60 सामन्यांचा खेळ संपला आहे. कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात 60वा सामना पार पडला. हा सामना कोलकाता नाईट रायडर्सने 29 धावांनी जिंकला आणि प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. तर गुजरात टायटन्सने हा सामना गमावल्याने प्लेऑफची शर्यत चुरशीची झाली आहे. कारण 16 गुण मिळवूनही गुजरात टायटन्सचं प्लेऑफमधील स्थान पक्कं झालेलं नाही. गुणतालिकेतील स्थिती पाहता अजून तसं झालेलं नाही. उलट उरलेला शेवटचा सामना गमावला तर प्लेऑफमधून पत्ता कापला जाऊ शकतो. गुजरात टायटन्सने आतापर्यंत 13 सामने खेळले असून त्यापैकी 8 सामन्यात विजय आणि पाच सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. गुजरात टायटन्स 16 गुण आणि +0.400 नेट रनरेटसह दुसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे शेवटचा सामना जिंकला तर प्लेऑफसाठी पात्र ठरतील. पण गमावला तर इतर संघांच्या निकालावर अवलंबून राहावं लागेल.

गुजरात टायटन्स आपला शेवटचा साखळी सामना 21 मे रोजी नरेंद्र मोदी स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध खेळेल. जर त्यांनी हा सामना जिंकला, तर 18 गुणांसह प्लेऑफमध्ये प्रवेश करतील. पण हा सामना गमावला तर त्यांना इतर संघांच्या जय-पराजयाचा विचार करावा लागेल. कारण प्लेऑफच्या शर्यतीत असलेल्या इतर पाच संघांना अजूनही 16 पेक्षा जास्त गुण मिळवण्याची संधी आहे. त्यामुळे जर गुजरात टायटन्स आपला शेवटचा सामना गमावला, तर सनरायझर्स हैदराबादने आपल्या पुढील दोन सामन्यांपैकी किमान एक सामना मोठ्या फरकाने गमावण्याची अपेक्षा करावी लागेल.

पंजाब किंग्सला त्यांच्या उर्वरित सामन्यांपैकी एक सामना गमवावा लागेल आणि त्यांचे गुण जास्तीत जास्त 15 पर्यंत मर्यादित राहतील. दुसरीकडे, राजस्थान रॉयल्सने त्यांच्या पुढील सामन्यांपैकी एकापेक्षा जास्त सामने जिंकता कामा नयेत. जर सनरायझर्स हैदराबाद, पंजाब किंग्स आणि राजस्थान रॉयल्स यांनी त्यांचे पुढील सामने जिंकले, तर गुजरात टायटन्स गुणतालिकेत पाचव्या स्थानावर घसरेल. म्हणजेच गुजरात टायटन्सला प्लेऑफमध्ये पोहोचण्याची संधी असली तरी एक छोटीशी चूकही महागात पडू शकते.

Follow Us