
बीसीसीआयकडून आयपीएलच्या आगामी 19 व्या मोसमाचं 11 मार्च रोजी पहिल्या टप्प्यातील वेळापत्रक जाहीर करण्यात आलं. आयपीएलच्या स्पर्धेदरम्यान 4 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे स्पर्धेदरम्यान कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागू नये यासाठी बीसीसीआयने 19 व्या मोसमासाठी फक्त पहिल्या टप्प्यातील वेळापत्रक जाहीर केलं आहे. या पहिल्या टप्प्यात एकूण 10 संघांमध्ये 16 दिवस 20 सामने खेळवण्यात येणार आहेत. प्रत्येक संघाला पहिल्या टप्प्यात 4 सामने खेळण्याची संधी मिळणार आहे. या मोसमाला सुरुवात होण्यासाठी अजून 2 आठवड्यांचा अवधी आहे. मात्र त्याआधी 10 संघ तयारीला लागले आहेत. अशात मुंबईकर फलंदाज अजिंक्य रहाणे याने कोलकाता नाईट रायडर्सच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिल्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या व्हायरल पोस्टबाबत काय खरं आणि काय खोटं हे आपण सविस्तर जाणून घेऊयात.
एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉमवर रहाणेच्या नावाचा दावा करणारी पोस्ट व्हायरल झाली आहे. “कोलकाता नाईट रायडर्सचं नेतृत्व करणं आणि विजय मिळवण सन्मानाची गोष्ट राहिली. आता नव्या हंगामाची सुरुवात आहे. नव्या नेतृत्वाचा घडवण्याची ही योग्य वेळ आहे, असं मला वाटतं. त्यामुळे मी कर्णधारपदी कायम न राहण्याचा निर्णय घेतला आहे”, असं रहाणेच्या नावाने व्हायरल होणाऱ्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. मात्र ही पोस्ट चुकीच्या दाव्यासह व्हायरल केली जात आहे. केकेआरचा कॅप्टन अजिंक्य याच्या नावाने व्हायरल होणारी ही पोस्ट फेक आहे.
Thank you 🙏🏻 pic.twitter.com/kcpfUZLA5Y
— Ajinkya Rihana (@OnlyGGmatters) March 12, 2026
अजिंक्यच्या नावाने व्हायरल होणाऱ्या पोस्टमध्ये चुकीचा दावा करण्यात आला आहे. अजिंक्यच्या कर्णधारपदाच्या राजीनाम्याची माहिती केकेआरच्या कोणत्याही अधिकृत सोशल मीडिया हॅन्डलवरुन देण्यात आलेली नाही. त्यामुळे ही पोस्ट फेक आहे, हे स्पष्ट होतं.
मुंबईच्या कर्णधारपदाचा राजीनामा
Captaining and winning championships with the Mumbai team has been an absolute honour.
With a new domestic season ahead, I believe it’s the right time to groom a new leader, and hence I’ve decided not to continue in the captaincy role.
I remain fully committed to giving my best…
— Ajinkya Rahane (@ajinkyarahane88) August 21, 2025
अजिंक्यने गेल्या वर्षी सोशल मीडियाद्वारे मुंबई क्रिकेट टीमच्या कर्णधारपदाचा राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं होतं. रहाणेने तेव्हा सोशल मीडियावर पोस्ट करत कर्णधारपद सोडत असल्याचं जाहीर केलेलं. रहाणेच्या याच पोस्टला सोयीनुसार एडीट करुन त्याने केकेआरच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिल्याचं भासवलं जात आहे. या पोस्टमध्ये मुंबईच्या जागी केकेआरचं नाव लिहिण्यात आलं आहे. त्यामुळे रहाणेने केकेआरचं कर्णधारपद सोडल्याची पोस्ट फेक असल्याचं स्पष्ट आहे.