IPL 2026: कोलकाता नाईट रायडर्सकडून पराभूत झाल्यानंतर शुबमन गिलने असं केलं पराभवाचं विश्लेषण
आयपीएल 2026 स्पर्धेतील 60व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने गुजरात टायटन्सला पराभवाची धूळ चारली. या पराभवानंतर गुजरात टायटन्सचं प्लेऑफ गाठण्याचं स्वप्न लांबलं आहे. त्यानंतर कर्णधार शुबमन गिलने आपलं म्हणणं मांडलं आहे.

आयपीएल 2026 स्पर्धेतील 60व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने बाजी मारली. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने गुजरात टायटन्ससमोर विजयासाठी 247 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण गुजरात टायटन्स संघ धावा करून शकला. खरं तर प्रत्येक षटकात धावांची गती राखणं काही गुजरात टायटन्सला गाठता आलं नाही. त्यामुळे चेंडू आणि धावांमधील अंतर वाढत गेलं आणि पराभव निश्चित होत गेला. कर्णधार शुबमन गिलने विजयासाठी पुरेपूर प्रयत्न केला. मोठे फटके मारले पण धावा आणि चेंडूमधील अंतर काही कमी झालं नाही आणि पदरी पराभव पडला. या पराभवामुळे गुजरात टायटन्सचं प्लेऑफमध्ये स्थान गाठण्याचं स्वप्न लांबलं आहे. आजचा सामना जिंकला असता तर गुजरात प्लेऑफ गाठणारा पहिला संघ ठरला असता. पण तसं काही शक्य झालं नाही. हा सामना गुजरात टायटन्सने 29 धावांनी गमावला. दुसरीकडे, या विजयासह कोलकाता नाईट रायडर्स संघ प्लेऑफच्या शर्यतीत आहे. या पराभवानंतर गुजरात टायटन्सचा कर्णधार शुबमन गिल याने आपलं मत माडलं.
काय म्हणाला शुबमन गिल?
गुजरात टायटन्सचा कर्णधार शुबमन गिल म्हणाला की, ‘विकेट पाहता, मला वाटले की 200-210 ही एक सरासरी धावसंख्या होती. आम्ही खूप झेल सोडले आणि गोलंदाजांसाठीही ते सोपे नव्हते. खेळपट्टी चांगली होती. चेंडू थांबत होते आणि तग धरत होते. मला वाटते की आम्ही इथपर्यंत पोहोचलो, ही एक चांगली कामगिरी होती. कोणतीही चिंता नाही, पण आमचे क्षेत्ररक्षण खूपच चांगले होऊ शकले असते. तीन सोपे झेल सोडल्यामुळे, मला वाटत नाही की आम्ही हा सामना जिंकण्यास पात्र होतो. क्वालिफायरमध्ये खेळण्याऐवजी आता असा सामना खेळणेच चांगले. दोन दिवस विश्रांती घेऊन सावरू. अहमदाबादला परत प्रवास करून पाहू की खेळपट्टी कशी वागते.’
गुजरात टायटन्स या स्पर्धेत एकूण 13 सामने खेळली आहे. त्यापैकी 8 सामन्यात विजय आणि पाच सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. गुजरात टायटन्सचे 16 गुण असून दुसऱ्या स्थानावर कायम आहेत. पण नेट रनरेट कमी झाला आहे. आधी +0.551 इतका होता. मात्र केकेआरकडून पराभव झाल्याने नेट रनरेट कमी झाला आहे. आता नेट रनरेट +0.400 इतका आहे. गुजरात टायटन्सचा या स्पर्धेतील शेवटचा सामना 21 मे रोजी चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध असणार आहे. दुसरीकडे, केकेआरने या विजयासह 11 गुणांची कमाई केली आहे आणि सातवं स्थान गाठलं आहे. अजून दोन सामन्यांचा खेळ शिल्लक असून 15 गुण होऊ शकतात.