IPL 2024, Orange Cap : ऑरेंज कॅपच्या रेसमध्ये शुबमन गिलची एन्ट्री, पाहा टॉप 5 फलंदाज कोण?
आयपीएलमध्ये ऑरेंज कॅपसाठीची शर्यत पुढे जाऊन आणखी चुरशीची होणार आहे. प्रत्येक सामन्यानंतर फलंदाज आक्रमक खेळीमुळ ऑरेंज कॅप गुणतालिकेत फरक पडताना दिसत आहे. सध्या ऑरेंज कॅप विराट कोहलीच्या डोक्यावर आहे. पण या शर्यतीत आता शुबमन गिलनेही एन्ट्री मारली आहे.

आयपीएल स्पर्धेत 17 वा सामना गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्स यांच्यात पार पडला. या सामन्यात नाणेफेकीचा कौल पंजाब किंग्सच्या बाजूने लागला. पंजाब किंग्सचा कर्णधार शिखर धवन याने टॉस जिंकताच प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. खरं तर शुबमन गिल यालाही गोलंदाजी घ्यायची होती. पण वाटेला फलंदाजी आली. मोठी धावसंख्या उभारण्याचं लक्ष्य ठेवून शुबमन गिलने अपेक्षित कामगिरी केली. नाबाद 89 खेळीमुळे संघाला 20 षटकात 199 धावांपर्यंत मजल मारता आली. 200 धावांचा पाठलाग करताना पंजाब किंग्सची दमछाक झाली. महत्त्वाच्या खेळाडूंनी ऐनवेळी विकेट्स टाकल्याने दबाव वाढत गेला. चेंडू आणि धावांमधील अंतर वाढत गेलं. पण शशांक सिंग आणि आशुतोष शर्माने मोक्याच्या क्षणी चांगली फलंदाजी केली. पंजाब किंग्सने गुजरात टायटन्सने 3 गडी राखू विजय मिळवला. दरम्यान गुजरातचा पराभव झाला असला सामन्यात सर्वोतम खेळी केलेल्या शुबमन गिलने ऑरेंज कॅपच्या शर्यतीत एन्ट्री मारली आहे.
शुबमन गिलने 48 चेंडूत 6 चौकार आणि 4 चौकारांच्या मदतीने नाबाद 89 धावा केल्या. तर साई सुदर्शनने 19 चेंडूत 6 चौकारांच्या मदतीने 33 धावा केल्या. या खेळीमुळे दोघांनी ऑरेंज कॅपच्या शर्यतीत एन्ट्री मारली आहे. या शर्यतीत विराट कोहली अव्वल स्थानी आहे. त्याने 4 सामन्यात 2 अर्धशतकांच्या मदतीने 203 धावा केल्या आहेत. दुसऱ्या स्थानावर राजस्थान रॉयल्सचा रियान पराग आहे. त्याने तीन सामन्यात 2 अर्धशतकांच्या मदतीने 181 धावा केल्या आहेत. तिसऱ्या स्थानावर हेन्रिक क्लासेन असून त्याने तीन सामन्यात दोन अर्धशतकांसह 167 धावा केल्या आहेत.
| प्लेयर्स | सामने | स्ट्राईक रेट | रन्स |
|---|---|---|---|
| विराट कोहली | 4 | 140.97 | 203 |
| रियान पराग | 3 | 160.17 | 181 |
| हेनरिक क्लासेन | 3 | 219.73 | 167 |
| शुबमन गिल | 4 | 159.22 | 164 |
| साई सुदर्शन | 4 | 160 | 128.00 |
चौथ्या स्थानावर गुजरात टायटन्सचा कर्णधार शुबमन गिल पोहोचला आहे. त्याने नाबाद 89 धावा करत या रेसमध्ये एन्ट्री मारली आहे. त्याच्या खात्यात चार सामन्यात 164 धावा झाल्या असून चौथं स्थान गाठलं आहे. त्याच्या खालोखाल पाचव्या स्थानावर गुजरात टायटन्सचा साई सुदर्शन आहे. त्याने चार सामन्यात एकूण 160 धावा केल्या आहेत. तर ऋषभ पंत टॉप 5 मधून बाहेर पडला आहे. साई सुदर्शन आणि त्याच्या धावसंख्येत 8 धावांचा फरक आहे. त्यामुळे पुढच्या काही सामन्यात ऑरेंज कॅपची शर्यत चुरशीची होणार आहे.
