
इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात भारताचा विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत दुखापतग्रस्त झाला आहे. त्यामुळे त्याचं पाचव्या कसोटीत खेळणं कठीण आहे. याच सामन्यात पायाचं बोट फ्रॅक्चर असताना कसाबसा उतरला आणि फलंदाजी केली. त्याच्याऐवजी संघात ध्रुव जुरेल विकेटकीपिंग करणार आहे. त्यामुळे पाचव्या कसोटीत तर त्याला आराम द्यावाच लागणार आहे. त्यामुळे त्याच्या जागी इशान किशनच्या नावाची चर्चा सुरु झाली होती. पण त्याने निवड होण्यापूर्वीच शेवटच्या सामन्यातून माघार घेतल्याचं कळत आहे. गेल्या दोन वर्षांपासून भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी त्याची धडपड सुरु आहे. मात्र आता संधी आली तेव्हा त्यानेच माघार घेतली आहे. त्याने निवड समितीला निवडीसाठी उपलब्ध नसल्याचं स्पष्ट सांगितलं आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमींमध्ये चर्चांना उधाण आलं आहे. असं का? असा प्रश्नही क्रीडाप्रेमी विचारत आहेत.
टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, इशान किशन स्कूटीवरून पडला होता. त्यामुळे त्याच्या डाव्या पायाला 10 टाके लागले आहेत. गुरुवारीच त्याचे टाके काढण्यात आले आहेत. सध्या त्याच्या डाव्या घोट्यावर प्लास्टर आहे. त्यामुळे दोन वर्षांनी त्याच्याकडे संधी चालून आली होती. मात्र आता या परिस्थितीत संघात स्थान मिळू शकत नाही. त्यामुळे नशिबाने त्याला पु्न्हा हुलकावणी दिली असंच म्हणावं लागेल. त्यामुळे ऋषभ पंतच्या जागी तामिळनाडूच्या एन जगदीसनला संघात स्थान मिळू शकते. कसोटी खेळणारा 319 वा खेळाडू ठरू शकतो.
इशान किशनला भारतीय संघात स्थान मिळवणं भविष्यात देखील कठीण आहे. कारण टी20 आणि वनडे क्रिकेटमध्ये तीव्र स्पर्धा आहे. ऋषभ पंतची टी20 संघातील जागा निश्चित नाही. अशात केएल राहुल आणि संजू सॅमसन हे निवडकर्त्यांची पहिली पसंती असणार आहेत. त्यात बॅकअप म्हणून टी20 क्रिकेटमध्ये जितेश शर्मा आणि वनडे क्रिकेटमध्ये ऋषभ पंत यांचं नाव आघाडीवर आहे. इशान किशन 2023 वनडे वर्ल्डकपनंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांची टी20 मालिका खेळला होता. मात्र त्यानंतर एकही सामना खेळलेला नाही. दरम्यान, त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये काही काळ काढला. आयपीएलमध्येही त्याची कामगिरी काही खास राहिली नाही.