ऋषभ पंतसह हे भारतीय खेळाडू वेदना विसरून उतरले होते मैदानात, जाणून घ्या
इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात दुखापतग्रस्त होऊनही ऋषभ पंत मैदानात उतरला. इतकंच नाही तर अर्धशतकही पूर्ण केलं. त्याच्या या झुंजार खेळीचं कौतुक होत आहे. पण ऋषभ पंत आधी काही भारतीय खेळाडूंनी अशीच भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं आहे.

मँचेस्टर कसोटी सामन्यात पायाला फ्रॅक्चर असूनही ऋषभ पंत मैदानात उतरला आणि भारताच्या पहिल्या डावात योगदान दिलं. त्याने 37 धावांच्या पुढे खेळताना 17 धावा अधिक जोडल्या. यासह त्याने 75 चेंडूत 3 चौकार आणि 2 षटकार मारत 54 धावा केल्या. खरं तर इतकी गंभीर दुखापत असताना मैदानात उतरण्याचं त्याने धाडस केलं. त्याला मैदानात उतरताना पाहून उपस्थित असलेल्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. जखमी असूनही मैदानात उतरणारा ऋषभ पंत हा काही भारताचा पहिला खेळाडू नाही. यापूर्वी दिग्गज खेळाडूंनी अशी कामगिरी केली आहे. यात भारताचा माजी क्रिकेटपटू कपिल देव आणि फिरकीपटू अनिल कुंबळे यांच्या नावाचाही समावेश आहे.
कपिल देव : कपिल देव 1980-81 च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात जखमी झाला होता. या मालिकेतील तिसऱ्या आणि चौथ्या सामन्यात कपिलला हॅमस्ट्रिंगला दुखापत झाली होती. भारताने पहिल्या डावात भारताने 237 धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाने त्या बदल्यात 419 धावांची खेळी केली. भारताने दुसऱ्या डावात 324 धावा केल्या आणि ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 143 धावा दिल्या. या सामन्यात कपिल देवने इंजेक्शन घेऊन गोलंदाजी केली. तसेच 28 धावा देत 5 विकेट घेतल्या. ऑस्ट्रेलिया संघ 83 धावांवर सर्वबाद झाला आणि भारताने हा सामना 59 धावांनी जिंकला.
अनिल कुंबळे : 2002 मध्ये एंटिगा येथे पार पडलेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी सामन्यात अशीच कामगिरी केली. भारताने पहिल्या डावात 9 विकेट गमवून 513 धावा करून डाव घोषित केला. या डावात अनिल कुंबलेला मर्वन डिल्लनचा चेंडू थेट जबड्यावर लागला होता. त्यामुळे खेळपट्टी सोडली आणि तंबूत गेला. पण असं असूनही अनिल कुंबळे हार पत्कारली नाही. तसेच गोलंदाजी करत दिग्गज फलंदाज ब्रायन लाराची विकेट काढली.
युवराज सिंग : युवराज सिंगची वनडे वर्ल्डकप 2011 स्पर्धेतील खेळी कोणीही विसरू शकत नाही. कँसर असताना त्याने या स्पर्धेत जबरदस्त कामगिरी केली. त्याने या स्पर्धेत 362 धावा केल्या आणि 15 विकेट घेतल्या. त्याच्या या कामगिरीमुळे भारताला जेतेपद मिळवण्यात मोलाचा हातभार लागला.
रोहित शर्मा : रोहित शर्माला बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात अंगठ्याला दुखापत झाली होती. असं असूनही तो मैदानात उतरला त्याने 28 चेंडूत नाबाद या 51 धावा केल्या. पण संघाला काही विजय मिळवता आला नाही. भारताने 272 धावांचा पाठलाग करताना पाच धावा कमी पडल्या. रोहित शर्माने या खेळीत पाच षटकार आणि तीन चौकार मारले.
