Bengaluru Stampede प्रकरणी सरकारचा मोठा निर्णय, मृतांच्या कुटुंबियांना 10 ऐवजी 25 लाखांची मदत

Karnataka Government Bengaluru Stampede : कर्नाटक सरकारने बंगळुरुत झालेल्या चेंगराचेंगरीतील 11 मृतांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत वाढवून देण्याचा निर्णय घेतला आहे.

Bengaluru Stampede प्रकरणी सरकारचा मोठा निर्णय, मृतांच्या कुटुंबियांना 10 ऐवजी 25 लाखांची मदत
Bengaluru Stampede M Chinnaswamy Stadium
Image Credit source: PTI
| Updated on: Jun 07, 2025 | 11:47 PM

बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेर 4 जून रोजी झालेल्या चेंगराचेंगरीत आरसीबीच्या 11 चाहत्यांचा दुर्देवी अंत झाला. कर्नाटक सरकारने या 11 मृतांच्या कुटुंबियांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने मृतांच्या कुटुंबियांसाठी जाहीर केलेल्या आर्थिक मदतीत वाढ केली आहे.राज्य सरकारकडून मृतांच्या कुटुंबियांना आणखी 15 लाख देण्यात येणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, मृतांच्या कुटुंबियांना आता प्रत्येकी 25 लाख रुपये मदत देण्यात येणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. याआधी 10 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली होती.

आरसीबीकडून 10 लाख रुपयांची मदत

कर्नाटक सरकराने चेंगराचेंगरीनंतर 10 लाख रुपयांची मदत जाहीर केली होती. त्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनेही पेटारा उघडला. आरसीबी फ्रँचायजीकडून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 10 लाख रुपये देणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यामुळे मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकार आणि आरसीबी या दोघांची मदत मिळून एकूण प्रत्येकी 35 लाख रुपये मिळणार आहेत.

निलंबन, अटक आणि राजीनामे

बंगळुरु चेंगराचेंगरी प्रकरणी आतापर्यंत अनेक अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आलंय. आरसीबीच्या मार्केटिंग हेडसह इतरांना अटक करण्यात आलीय. तर केएससीएच्या पदाधिकाऱ्यांना राजीनामेही द्यावे लागले आहेत. सर्वात आधी या प्रकरणानंतर आरसीबी, कर्नाटक स्टेट क्रिकेट असोसिएशन आणि डीएनए या इव्हेटं मॅनेजमेंट कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. विजयी जल्लोषात चाहत्यांच्या सुरक्षेबाबत हलगर्जीपणा केल्याचा उल्लेख या एफआरमध्ये करण्यात आला. त्यानंतर राज्य सरकारने बंगळुरु पोलीस आयुक्तांसह अन्य अधिकाऱ्यांचं निलंबन केलं. त्यानंतर आरसीबी मार्केटिंग हेड निखिल सोसाळे याच्यासह डीएनए या कंपनीच्या तिघांना असे एकूण चौघांना अटक केली गेली. तर त्यानंतर केएसीएच्या कोषाध्यक्ष आणि सचिवांनी पदाचा राजीनामा दिलाय.

विराट कोहलीविरोधात तक्रार

आरसीबीच्या विजयी जल्लोषादरम्यान झालेल्या या दुर्घटेनत विराट कोहली याच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. विराटविरोधात बंगळुरुतील कब्बन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली गेली. वरिष्ठ सामाजिक कार्यकर्ते एच एम व्यंकटेश यांनी विराटविरोधात ही तक्रार केली.

कर्नाटक सरकारकडून 10 ऐवजी 25 लाख रुपयांची मदत

जल्लोषाचं रुपांतर शोकात

आरसीबीने 3 जून रोजी अंतिम सामन्यात पंजाब किंग्सवर मात करत 18 व्या वर्षी आयपीएल ट्रॉफी जिंकली. त्यामुळे आरसीबी टीम आणि चाहत्यांमध्ये जल्लोषाचं वातावरण होतं. आयपीएल ट्रॉफीचा आनंद चाहत्यांसह साजरा करण्यासाठी एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये खेळाडूंच्या सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यकमात लाखोंच्या संख्येने चाहते आले. त्यामुळे झालेल्या चेंगराचेंगरीत 11 जणांना मृत्यू झाला. त्यामुळे आरसीबीच्या ऐतिहासिक विजयाला गाळबोट लागलं.