
आयपीएल 2025 स्पर्धेच्या अंतिम फेरीत पंजाब किंग्सने मोठ्या दिमाखात धडक मारली आहे. क्वॉलिफायर 2 फेरीत मुंबई इंडियन्सचा 6 गडी राखून पराभव केला आणि अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीत पंजाब किंग्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुशी होणार आहे. यंदा आयपीएलमध्ये नवा विजेता मिळणार हे आता निश्चित झालं आहे. कारण रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि पंजाब किंग्स या दोन्ही फ्रेंचायझीनी एकही सामना जिंकलेला नाही. जेतेपदासाठी दोन्ही संघांमध्ये जोरदार चुरस असणार आहे. दरम्यान, मुंबई इंडियन्सने पंजाब किंग्ससमोर विजयासाठी 204 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान गाठताना पंजाब किंग्सने सुरुवातीला विकेट गमावल्या. पॉवर प्लेमध्ये 2 गडी गमवून 64 धावा केल्या होत्या. त्यानंतर जोस इंग्लिसची विकेट पडली आणि पंजाब किंग्सवर दडपण वाढलं. पण कर्णधार श्रेयस अय्यर आणि नेहल वढेरा यांनी चांगली भागीदारी केली. या भागीदारीमुळे मुंबई इंडियन्सचा पराभव निश्चित झाला. खरं तर ही जोडी फोडण्यात कर्णधार हार्दिक पांड्याला यश आलं होतं. पण ट्रेंट बोल्टने चूक केली आणि त्याचा फटका संपूर्ण संघाला भरावा लागला.
नेहल वढेरा 13 धावांवर होता आणि 10 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर फटका मारताना चुकला. फाईन लेगला फिल्डिंगला असलेल्या ट्रेंट बोल्टच्या हाती झेल होता. अगदी सोपा झेल होता. पण हातून झेल सुटला आणि मुंबई इंडियन्सच्या हातून सामना गेला. झेल सोडला तेव्हाच सर्वांना ही चूक मोठी असल्याचं लक्षात आलं. हार्दिक पांड्याही खाली बसून राहिला. कारण ही विकेट किती महागात पडू शकते याचा अंदाज आला होता. नेहल वढेरा मिळालेल्या जीवदानाचा पुरेपूर फायदा उचलला आणि मुंबईच्या गोलंदाजांवर तुटून पडला.
Trent Boult dropped Nehal Wadhera, some luck favored PBKS and not Hardik Pandya 😂#IPL #IPL2025 #MIvsPBKS #PBKSvsMI #MIvPBKS #PBKSvMI #RohitSharma #Surya pic.twitter.com/ySJkremeES
— Cric_Lover 🏏 (@ankit_bhattar) June 1, 2025
नेहल वढेराने 29 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 48 धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीमुळे पंजाब किंग्सचा विजय सोपा झाला होता. अश्वनी कुमारच्या गोलंदाजीवर फटका मारताना चुकला आणि झेल बाद झाला. सँटनरने त्याचा झेल पकडण्यात कोणतीही चूक केली नाही. पण तिथपर्यंत हा सामना मुंबईच्या हातून निसटला होता. नेहल वढेराने श्रेयस अय्यर सोबत 84 धावांची महत्त्वाची भागीदारी केली.