Video : मोहम्मद सिराजच्या सेलिब्रेशनची शैली बदलली, जाणून घ्या या मागचं कारण
मोहम्मद सिराजने विकेट घेतल्यानंतर त्याचं सेलीब्रेशन कायम चर्चेत असायचं. फूटबॉलपटू रोनाल्डोच्या सेलिब्रेशनची शैली त्यांनी अंगिकारली होती. पण लॉर्ड्स कसोटीत त्याने विकेट घेतल्यानंतर वेगळ्याच शैलीत सेलीब्रेशन केलं. असं करण्याचं कारण जाणून घ्या.

वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज पहिल्या कसोटी सामन्यात खूपच महागडा ठरला होता. त्यामुळे त्याच्यावर सर्वच स्तरातून टीका होत होती. मात्र दुसऱ्या कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराहच्या गैरहजेरीत त्याने चांगली कामगिरी केली. तसेच विजयात मोलाचा वाटा उचलला. तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावातही त्याने दोन गडी बाद केले. मात्र विकेट घेतल्यानंतर त्याच्या सेलिब्रेशनच्या शैलीत बदल दिसून आला. लॉर्ड्स कसोटी सामन्यात त्याने जेमी स्मिथची विकेट घेतली आणि रोजच्या पेक्षा वेगळ्या शैलीत सेलीब्रेशन केलं. त्यामुळे क्रीडाप्रेमींना असं करण्याचं कारण काही कळलं नाही. नेमकी त्याने आपली शैली का बदलली असा प्रश्नही अनेकांना पडला आहे. पण अशा पद्धतीने सेलीब्रेशन करण्याचं एक वेगळं कारण आहे. काही दिवसांपूर्वी लिव्हरपूलकडून फुटबॉल खेळणाऱ्या डिओगो जोटा याचं रस्ते अपघातात निधन झाल होतं. तेव्हापासून सर्वच दिग्गज खेळाडू त्याला श्रद्धांजली वाहात आहेत. मोहम्मद सिराजनेही तसंच काहीसं केलं.
मोहम्मद सिराजने जेमी स्मिथची विकेट घेतल्यानंतर 20 क्रमांकाकडे बोट दाखवलं. डिओगो जोटा पूर्वी याच जर्सी क्रमांकावर फुटबॉल खेळायचा. त्यामुळे सिराजच्या या सेलिब्रेशनचं सोशल मीडियावर कौतुक होत आहे. स्मिथचा झेल ध्रुव जुरेलने पकडल्यानंतर सिराज मागे वळला आणि त्याने एका हाताने दोन दाखवले आणि दुसऱ्या हाताने शून्य केला. सिराजने लॉर्ड्स कसोटी सामन्यातील पहिल्या डावात 85 धावा देत दोन गडी बाद केले.
Mohammad Siraj picking the wicket of Jamie Smith and giving a tribute to Diogo Jota !! ❤️#INDvsENG #INDvENG #ENGvsIND #ENGvIND
— Cricketism (@MidnightMusinng) July 11, 2025
इंग्लंडने पहिल्या डावात सर्व गडी बाद 387 धावांची खेळी केली आहे. आता या धावांचा पाठलाग करून आघाडी घेतली तर टीम इंडियाला फायद्याचं ठरेल. अन्यथा टीम इंडिया तिसऱ्या दिवशीच अडचणीत येऊ शकते. दरम्यान या धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाने दोन गडी गमावले आहेत. यशस्वी जयस्वाल 8 चेंडूत 13 धावा करून बाद झाला आहे. तर करूण नायरचं नशिब आताही फुटकं निघालं. त्याने 62 चेंडूत चार चौकार मारून 40 धावा केल्या. त्यामुळे आतापर्यंत मिळालेली पाचवी संधीही वाया घालवली असंच म्हणावं लागेल. जर त्याचा खेळ असाच सुरु राहिला तर टीम इंडियाच्या बाहेर जाण्याची वेळ येईल.
