MUM vs BRD : मुंबईला चौथ्या दिवशी बडोदा विरुद्ध विजयासाठी 220 धावांची गरज, रहाणे-श्रेयसवर जबाबदारी, कोण जिंकणार?
Baroda vs Mumbai 3rd Day Highlight In Marathi: मुंबईने बडोदा विरुद्ध 262 धावांचा पाठलाग करताना तिसऱ्या दिवसापर्यंत 2 विकेट्स गमावून 42 धावा केल्या आहेत.
मुंबई विरुद्ध बडोदा यांच्यातील रणजी ट्रॉफी स्पर्धेतील तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. मुंबईला चौथ्या दिवशी विजयासाठी आणखी 220 धावांची गरज आहे. बडोदाने भारताला तिसऱ्या दिवशी 262 धावांचं आव्हान दिलं. मुंबईने या धावांचा पाठलाग करताना खेळ संपेपर्यंत 10.4 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून 42 धावा केल्या आहेत. मुंबईने पृथ्वी शॉ आणि हार्दिक तामोरे यांच्या रुपात 2 विकेट्स गमावल्या आहेत. पृथ्वीने 18 बॉलमध्ये 12 रन्स केल्या. तर हार्दिक तामोरे 6 वर रनआऊट झाला. तर खेळ संपला तेव्हा कॅप्टन अजिंक्य रहाणे आणि युवा आयुष म्हात्रे ही जोडी नाबाद परतली. रहाणे 4 आणि आयुष 19 धावावंर नाबाद आहे. तर बडोदाकडून महेश पीठीयाने याने 1 विकेट घेतली.
बडोदाचा दुसरा डाव
बडोदाने पहिल्या डावात 290 केल्यानंतर मुंबईला 214 धावांवर ऑलआऊट करत 76ची आघाडी घेतली. बडोद्याला दुसऱ्या डावात मोठी आघाडी घेऊन मुंबईसमोर धावांचा डोंगर उभारण्याची संधी होती. मात्र मुंबईच्या गोलंदाजांनी बडोदाला रोखण्यात यश मिळवलं. मुंबईने बडोदाला दुसऱ्या डावात 60.3 ओव्हरमध्ये 185 धावांवर रोखलं. त्यामुळे मुंबईला 262 धावांचं आव्हान मिळालं. बडोदाकडून कॅप्टन कृणाल पंड्याने सर्वाधिक 55 धावा केल्या. महेश पीठीयाने 40 तर अतित शेठने 26 धावांचं योगदान दिलं. तर इतरांना काही खास करता आलं नाही. मुंबईकडून तनुष कोटीयनने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. हिमांशु सिंह याने तिघांना आऊट केलं. तर शार्दूल ठाकुर आणि मोहित अवस्थी या दोघांनी 1-1 विकेट घेतली.
त्यानंतर 262 धावांचा पाठलाग करायला आलेल्या मुंबईची खास सुरुवात राहिली नाही. मुंबईने 25 धावांवर पहिली आणि 33 वर दुसरी विकेट गमावली. आता आयुष आणि रहाणे मैदानात आहेत. तर त्यानंतर मुंबईकडे श्रेयस अय्यरसारखा अनुभवी फलंदाज आहे. तसेच इतर फलंदाजही आहेत. मात्र श्रेयस आणि अजिंक्य या अनुभवी जोडीकडून मुंबईला चौथ्या दिवशी विजयी खेळीची अपेक्षा असणार आहे.
मुंबईला विजयापासून 220 धावा दूर
Mumbai wraps up Day 3 with a stellar performance on the field! 🔥#MCA #Mumbai #Cricket #Wankhede #BCCI pic.twitter.com/p9657nFHAu
— Mumbai Cricket Association (MCA) (@MumbaiCricAssoc) October 13, 2024
बडोदा प्लेइंग ईलेव्हन : क्रुणाल पंड्या (कर्णधार), ज्योत्स्निल सिंग, शिवालिक शर्मा, शाश्वत रावत, विष्णू सोलंकी, मितेश पटेल (विकेटकीपर), राज लिंबानी, महेश पीठिया, अतित शेठ, अभिमन्यू सिंग राजपूत आणि भार्गव भट्ट
मुंबई प्लेइंग ईलेव्हन : अजिंक्य रहाणे (कर्णधार), पृथ्वी शॉ, आयुष म्हात्रे, सिद्धेश लाड, श्रेयस अय्यर, हार्दिक तामोरे (विकेटकीपर), शम्स मुलानी, तनुष कोटियन, शार्दूल ठाकुर, मोहित अवस्थी आणि हिमांशू वीर सिंग.