
टीम इंडियाने आशिया कप 2025 स्पर्धेतील सुपर 4 फेरीत रविवारी 21 सप्टेंबरला 6 विकेट्सने मात करत फायनलच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकलं. भारताने 172 धावांचं आव्हान हे 18.5 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून सहज पूर्ण केलं. अभिषेक शर्मा याने केलेल्या 74 धावांच्या जोरावर भारताने सहज विजय साकारला. मात्र या सामन्यादरम्यान पाकिस्तानच्या फलंदाजाने केलेल्या एका कृतीमुळे सोशल मीडियावर संताप पाहायला मिळत आहे. पाकिस्तानच्या त्या फलंदाजाने नक्की काय केलं? हे जाणून घेऊयात.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान दोन्ही देशांमधील संबध ताणले गेले आहेत. तीव्र विरोधानंतरही दोन्ही देशातील संघात सामने झाले. भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात गेल्या रविवारी 14 सप्टेंबरला साखळी फेरीत सामना झाला. त्या सामन्याला तीव्र विरोध करण्यात आला. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय खेळाडूंनी त्या सामन्यात पाकिस्तानी खेळाडूंसह हस्तांदोलन केलं नाही. त्यामुळे नो हँडशेकवरुन वाद झाला. हा वाद शमतो न शमतो तेवढ्यात आणखी एका वादाला तोंड फुटलं आहे. पाकिस्तानचा सलामीवीर फलंदाज साहिबझादा फरहान याने केलेल्या सेलिब्रेशेनमुळे नेटकरी चांगलेच आक्रमक झाले आहेत.
साहिबझादा फरहान याने टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तानसाठी सर्वाधिक 58 धावा केल्या. साहिबझादाने या दरम्यान 34 बॉलमध्ये अर्धशतक झळकावलं. साहिबझादाने अर्धशतकाचं सेलीब्रेशन ज्या पद्धतीने केलं त्यानंतर सोशल मीडियावर संताप पाहायला मिळत आहे. साहिबझादाने अर्धशतकानंतर बॅट बंदूकीप्रमाणे हातात धरली आणि फायरिंग करण्याची एक्शन केली. साहिबझादाच्या या एक्शनने आता सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे.
पहलगाम दहशतावादी हल्ल्याच्या जखमा आजही ताज्या आहेत. त्यात साहिबझादाने अशी कृती करुन एकाप्रकारे भारतीयांच्या जखमेवर मीठ चोलण्याचा प्रयत्न केल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे हा क्रिकेटर आहे की दहशतवादी? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. तसेच साहिबझादावर या कृतीसाठी एसीसीने (Asian Cricket Council) कारवाई करावी, अशी मागणी आता केली जात आहे.
दरम्यान या सर्व प्रकारानंतर सर्वच स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे. तर विरोधकांनी या मुद्दयावरुन केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सर्वेसर्वा रोहित पवार यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे या प्रकरणावर संताप व्यक्त केला आहे. तसेच शिवसेना ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी बीसीसीआय, केंद्र सरकार आणि जय शाह याच्यांवर थेट निशाणा साधला आहे.
संजय राऊत यांनी साहिबझादा याचा तो फोटो शेअर करत एक पोस्ट केलीय. राऊतांनी या पोस्टमधून बीसीसीआय, मोदी सरकार आणि जय शाह यांच्यावर हल्लाबोल केला.
संजय राऊत काय म्हणाले?
आजच्या भारत पाकिस्तान सामन्यात हे घडले
सोहबजादा फरहान याचे अर्ध शतक लागताच त्याने मैदानात AK 47 प्रमाणे बॅट धरून गोळीबाराची एक्शन केली,
पाकड्यानी निरपराध भारतीय पर्यटकांना असे मारले हेच तो त्याच्या कृतीतून दाखवत होता
बीसीसीआय आणि मोदी सरकारसाठी ही लज्जास्पद बाब आहे.
भारताचे… pic.twitter.com/AgByPlaWwu— Sanjay Raut (@rautsanjay61) September 21, 2025
अत्यंत संतापजनक आणि आक्षेपार्ह बाब : रोहित पवार
पहलगाममध्ये २७ निरपराध नागरिकांचा बळी घेणाऱ्या पाकसोबत क्रिकेट खेळण्यास भारतातील बहुतेक क्रिकेट प्रेमींचा विरोध असतानाही पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळण्याचा निर्णय #BCCI ने घेतला, पण कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच हेच पाकने आज दाखवून दिलं. त्यांचा मस्तवाल खेळाडू साहिबजादा फरहान… pic.twitter.com/MXgZivVH7i
— Rohit Pawar (@RRPSpeaks) September 21, 2025
साहिबझादाने केलेली कृती ही अत्यंत संतापजनक आणि आक्षेपार्ह असल्याचं रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय. तसेच अशा कृतीनंतरही या देशासोबत खेळायचं का याबाबत बीसीसीआयने फेरविचार करावा, असंही कळकळीची विनंती रोहित पवार यांनी एक्स पोस्टद्वारे केलीय.