Icc : आयसीसीकडून पाकिस्तानच्या खेळाडूला तगडा झटका, मालिकेदरम्यान मोठी कारवाई
NZ vs PAK 1st T20i : पाकिस्तानच्या खेळाडूला भरमदैानात लाईव्ह सामन्यात न्यूझीलंडच्या खेळाडूला धक्का देणं चांगलंच अंगलट आलं आहे. आयसीसीने या खेळाडूला चांगलीच अद्दल घडवली आहे.

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत एकही सामना जिंकू नशकणाऱ्या पाकिस्तान क्रिकेट टीमच्या एका खेळाडूला न्यूझीलंड दौऱ्यात मोठा झटका लागला आहे. आयसीसीने पाकिस्तानचा खेळाडू खुशदिल शाह यावर मोठी कारवाई केली आहे. आयसीसीने खुशदिलवर दंडात्मक कारवाई केली आहे. आयीसीसीने दिलेल्या माहितीनुसार, खुशदिलने न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात गोलंदाज झॅकरी फॉल्केस याला धक्का मारला होता. त्यामुळे आयसीसीच्या कारवाईनुसार खुशदिलला सामन्याच्या मानधनापैकी 50 टक्के रक्कम दंड म्हणून द्यावी लागली आहे. तसेच 3 डिमेरिट पॉइंटही दिले आहे. खुशदिलवर आयसीसीने आचार संहितेच्या 2.12 नुसार ही कारवाई केली आहे. आयसीसी आचार संहितेच्या 2.12 नुसार खेळाडू, सपोर्ट स्टाफ, पंच, सामनाधिकारी किंवा क्रिकेट चाहत्यासोबत चुकीच्या पद्धतीने शारिरीक संपर्क झाल्यास कारवाईची तरतूद आहे. आयसीसीने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन याबाबतची माहिती दिली आहे.
नक्की काय झालं?
न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान यांच्यात 16 मार्चला पहिला टी 20i सामना खेळवण्यात आला. सामन्यातील पहिल्या डावात पाकिस्तानची बॅटिंग होती. तेव्हा खुशदिलने झॅकरीला मागून धक्का दिला. खुशदिलने जाणिवपूर्वक आणि ताकदीने झॅकरीला धक्का दिल्याचा दावा केला जात आहे. तसेच ही कृती टाळता येणारी होती. ही कृती नजरचुकीने झाली नसल्याचं म्हटलं जात आहे. त्यानंतर पंचांनी आणि सामनाधिकारी जेफ क्रो यांनी केलेले आरोप खुशदिलने मान्य केले. त्यामुळे औपचारिक सुनावणी करण्यात आली नाही.
खुशदिलवर बंदीची टांगती तलवार
खुशदिल याला 3 डिमेरिट पॉइंट्स देण्यात आले आहेत. खुशदिलकडून 24 महिन्यात झालेली ही पहिली चूक होती. एखाद्या खेळाडूला 24 महिन्यांत 4 किंवा त्यापेक्षा जास्त डिमेरिट पॉइंट्स मिळाल्यास त्याचं रुपांतर हे सस्पेंशन पॉइंटसमध्ये होतं. 2 सस्पेंशन पॉइंट्स झाल्यास त्या खेळाडूला 1 कसोटी आणि 2 वनडे/2 टी 20i सामन्यांसाठी बंदी घातली जाते.
खुशदिलवर आयसीसीची दंडात्मक कारवाई
Pakistan all-rounder fined for breaching ICC Code of Conduct during the first #NZvPAK T20I.
More ⬇️https://t.co/0IMr1ZnkSU
— ICC (@ICC) March 17, 2025
दरम्यान न्यूझीलंडने रविवारी पाकिस्तानचा पहिल्या टी 20i सामन्यात 9 विकेट्सने धुव्वा उडवला. न्यूझीलंडने पाकिस्तानला 18.4 ओव्हरमध्ये 91 धावांवर गुंडाळं. त्यानंतर न्यूझीलंडने 92 धावांचं आव्हान हे 10.1 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून सहज पूर्ण केलं. उभयसंघातील दुसरा सामना हा मंगळवारी 18 मार्च रोजी होणार आहे.