PAK vs BAN Test: सउद शकील आणि मोहम्मद रिझवानची शतकी खेळी, बांगलादेशची पहिल्या डावात दैना
पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात पहिला कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल बांगलादेशच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सर्वकाही ठीक सुरु होतं. पण आयुब, सउद आणि रिझवानने सर्व गणित फिस्कटवून टाकलं.

पाकिस्तान बांगलादेश यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी पावसामुळे आउटफिल्ड ओली झाली होती. त्यामुळे सामना सुरु होण्यास उशीर झाला. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर बांगलादेशने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय सुरुवातीला योग्य असल्याचं वाटलं. कारण अवघ्या 16 धावांवर आघाडीचे तीन फलंदाज तंबूत परतले होते. त्यानंतर सईम आयुब आणि सउद शकील यांनी डाव सावरला. चौथ्या गड्यासाठी 98 धावांची भागीदारी केली. सईम 56 धावा करून बाद झाला. त्यानंतर सउद शकील आणि मोहम्मद रिझवान यांनी मोर्चा सांभाळला. तसेच बांगलादेशला डोकं वर काढू दिलं नाही. दोघांनी सावध खेळी करत शतकं ठोकली. यामुळे पाकिस्तानच्या पहिल्या डावात 300 पार धावसंख्या गेली आहे. पाकिस्तानने तीन सामन्यांची कसोटी मालिका 3-0 ने जिंकली तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मालिकेकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे.
सउद शकील आणि मोहम्मद रिझवान यांनी पाचव्या गड्यासाठी 200 हून अधिक धावांची भागीदारी केली. यामुळे पाकिस्तानला कमी धावांवर रोखण्याचं बांगलादेशचं स्वप्न भंगलं आहे. यामुळे पाकिस्तानची पहिल्या डावावर मजबूत पकड निर्माण झाली आहे. मोहम्मद रिझवान आणि सउद शकील यांनी आपल्या कसोटी कारकिर्दितील तिसरं शतक झळकावलं आहे. सउद शकीलने 195 चेंडूत पाच चौकारांच्या मदतीने शतकी खेळी केली. तर मोहम्मद रिझवानने 143 चेंडूत शतकी खेळी केली. 97 धावांवर असताना चौकार मारत त्याने शतक पूर्ण केलं. आपल्या खेळीत त्याने 8 चौकार आणि 2 षटकार मारले.
दोन्ही संघांची प्लेइंग 11
बांगलादेश (प्लेइंग इलेव्हन): नजमुल हुसेन शांतो (कर्णदार), शादमान इस्लाम, झाकीर हसन, मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शकीब अल हसन, लिटन दास (विकेटकीपर), मेहदी हसन मिराझ, शोरीफुल इस्लाम, हसन महमूद, नाहिद राणा.
पाकिस्तान (प्लेइंग इलेव्हन): अब्दुल्ला शफीक, सइम आयुब, शान मसूद (कर्णधार), बाबर आझम, सउद शकील, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), आगा सलमान, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, खुर्रम शहजाद, मोहम्मद अली
