PAK vs BAN : मोहम्मद रिझवानचं द्विशतक रोखण्यासाठी ड्रेसिंग रुममध्ये रचला गेला कट! सउद शकीलने सर्वकाही आणलं समोर
पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका होत आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात पाकिस्तानने दम दाखवला. तीन गडी झटपट बाद झाल्यानंतरही 448 धावांवर मजल मारली. यात मोहम्मद रिझवान आणि सउद शकील यांची खेळी महत्त्वाची ठरली. रिझवानचं शतक डाव घोषित केल्याने होऊ शकलं नाही, असा आरोप होत आहे. त्याबाबत सउद शकीलने सर्वकाही सांगितलं.

पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना होत आहे. नाणेफेकीचा कौल बांगलादेशच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानचे आघाडीचे तीन फलंदाज झटपट बाद झाले. यानंतर मोहम्मद रिझवान आणि सउद शकील यांनी मोर्चा सांभाळला. दोघांनी आपली शतकं साजरी केली. इतकंच काय तर विकेटकीपर फलंदाज मोहम्मद रिझवानने झटपट दीड शतक करून द्विशतकाकडे कूच केली होती. रिझवान 171 धावांवर खेळपट्टीवर टिकून होता. पण तितक्यात पाकिस्तानचा कर्णधार शान मसूदने डाव घोषित केला आणि रिझवानची द्विशतकी खेळी हुकली. मैदानातून बाहेर जाताना मोहम्मद रिझवानच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसत होती. रिझवानचं द्विशतक झालं नाही यावरून आता उलटसुलट चर्चा सुरु आहेत. आता त्याचा जोडीदार आणि 240 पार्टनरशिप केलेल्या सउद शकीलने याबाबत खुलासा केला आहे.
रिझवानला आपलं द्विशतक पूर्ण करण्यासाठी फक्त 29 धावांची गरज होती. त्याची फलंदाजी पाहता ही धावसंख्या गाठणं सहज सोपं होतं असं होतं. त्यामुळे पाकिस्तानचा कर्णधार शान मसूद क्रीडाप्रेमींच्या रडारवर आला आहे. आता यावर सउद शकीलने स्पष्टीकरण दिलं आहे. पत्रकार परिषदेत शकीने सांगितलं की, ‘रिझवानच्या द्विशतकाचा प्रश्नावर इतकंच सांगेल की हा निर्णय काय घाईगडबडीत घेतलेला नाही. असं काहीच झालेलं नाही. त्याने एका तासाआधीच डाव कधीही घोषित करणार असल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे कधीही डाव घोषित होऊ शकतो याचा अंदाज होता. त्यांनी सांगितल होतं की संघाच्या धावा 450 जवळ गेल्या की डाव घोषित करू.’
पाकिस्तानने 6 गडी बाद 448 धावा असताना डाव घोषित केला. तसेच बांगलादेशसमोर पहिल्याच डावात मोठं आव्हान दिलं. दुसरीकडे, या धावांचा पाठलाग करताना बांगलादेशनेही कडवी झुंज दिली आहे. शदमन इस्लामने शतकाच्या दिशेने कूच केली होती. 93 धावांवर असताना शदमन बाद झाला. तर मोनिमुल रहिम अर्धशतक करून बाद झाला आहे. तिसऱ्या दिवशी 65 षटकांचा खेळ झाला तेव्हा बांगलादेशने 3 बाद 197 धावा केल्या होत्या. अजूनही बांगलादेशचा संघ 251 धावांनी पिछाडीवर आहे.
