
टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी पाकिस्तानच्या नाटकी काही केल्या काही कमी होताना दिसत नाही. बांगलादेशला टी20 वर्ल्डकप स्पर्धेनंतर वगळल्यानंतर पाकिस्तानने पाठिंब्याचा आव आणला आहे. तसं पाहिलं तर पाकिस्तानने बांगलादेशसाठी फार काही केलेलं दिसत नाही. स्पर्धेत खेळणार की नाही याबाबतही स्पष्ट केलं नाही. त्यामुळे भिजत घोंगड ठेवल्याचं दिसत आहे. आता स्पर्धेला अवघ्या एक आठवड्याचा अवधी शिल्लक असताना पाकिस्तानचं तळ्यातमळ्यात सुरू झालं आहे. पाकिस्तानचा संघ टी20 वर्ल्डकप स्पर्धेत खेळेल की नाही अद्याप अस्पष्ट आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी संघ जाहीर केला आहे. पण पुढचं काय ते अद्याप स्पष्ट नाही. पीसीबीने हा चेंडू पाकिस्तान सरकारच्या कोर्टात टाकला आहे. असं असताना अचानक शनिवारी होणारा जर्सी प्रकाशन कार्यक्रम रद्द केला. त्यामुळे पाकिस्तान ऐनवेळी स्पर्धेतून माघार घेण्याची शक्यता वाढली आहे.
पाकिस्तानचा संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी20 मालिका खेळत आहे. मालिकेतील दुसऱ्या टी20 सामन्याच्या नाणेफेकीनंतर जर्सीचे अनावरण होणार होते. पण पाकिस्तान सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून परवानगी न मिळाल्याने कार्यक्रम रद्द करण्यात आला. त्यामुळे पाकिस्तान या स्पर्धेतून माघार घेण्याची शक्यता वाढल्याची चर्चा रंगली आहे. पाकिस्तानची ओळख दगाफटका करणाऱ्या देशात होते. त्यामुळे आयसीसीने आधीच पावलं उचलणं आवश्यक आहे. कारण मोक्याच्या क्षणी माघार घेतली तर संघाची जुळवाजुळव करणं कठीण जाईल. आधीच बांगलादेशच्या जागी स्कॉटलँड संघाची निवड केली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, पाकिस्तान संघाने 2 फेब्रुवारी (सोमवार) कोलंबोला जाण्यासाठी विमान तिकिटे बुक केली आहेत. पाकिस्तान सरकार त्याच दिवशी आपला अंतिम निर्णय जाहीर करेल. जर सरकारने हिरवा कंदील दिला तर संघ थेट श्रीलंकेत पोहोचेल. अन्यथा या स्पर्धेत खेळणार नाही हे स्पष्ट होईल. दरम्यान हायब्रिड मॉडेलनुसार, पाकिस्तान त्यांचे गट सामने श्रीलंकेतच खेळेल. 15 फेब्रुवारीला भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. पण स्पर्धेतून माघार घेतल्यास युगांडा या देशाला खेळण्याची संधी मिळेल. युगांडा क्रिकेटने लिहिलेली एक पोस्ट व्हायरल होत आहे की, “जर तुम्ही आला नाहीत तर आम्ही येण्यास तयार आहोत, आमचे पासपोर्ट तयार आहेत.”