टी20 वर्ल्डकपपूर्वी श्रीलंकेत पाकिस्तानची विजय सुरुवात, पहिल्याच सामन्यात घेतला खेळपट्टीचा अंदाज
श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यात तीन सामन्यांची टी20 मालिका होत आहे. या मालिकेतील पहिल्याच सामन्यात पाकिस्तानने 6 गडी राखून विजय मिळवला. या विजयासह पाकिस्तानचा टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी आत्मविश्वास दुणावला आहे.

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेपूर्वी श्रीलंका आणि पाकिस्तान यांची लिटमस टेस्ट सुरु आहे. तीन सामन्यांच्या टी20 मालिकेतून भक्कम बाजू कळणार आहे. या परीक्षेतील पहिल्याच सामन्यात पाकिस्तानने बाजी मारली. पाकिस्तानचे सर्व सामने हे श्रीलंकेत होणार आहेत. त्यामुळे या विजयामुळे आत्मविश्वास दुणावला आहे. पाकिस्तानने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. श्रीलंकेची फलंदाजी एकदम सुमार राहिली. त्यांना 20 षटकंही पूर्ण खेळता आली नाहीत. श्रीलंकेने 19.2 षटकात सर्व गडी गमवून 128 धावा केल्या आणि विजयाठी 129 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान पाकिस्तानने 16.4 षटकात 4 गडी गमवून पूर्ण केलं. यासह तीन सामन्यांच्या टी20 मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे.
टी20 सामन्यात श्रीलंकेकडून जानिथ लियानागे वगळता एकही फलंदाज साजेशी कामगिरी करू शकला नाही. त्याच्या व्यतिरिक्त एकाही फलंदाजाने 20 धावांचा आकडा गाठला नाही. त्याने 31 चेंडूत 2 चौकार आणि 1 षटकार मारत 40 धावा केल्या. पाकिस्तानकडून सलमान मिर्झाने 4 षटकात 18 धावा देत 3 विकेट, अबरार अहमदने 4 षटकात 25 धावा देत 3 विकेट, वासिमने 2.2 षटकात 7 धावा देत 2 विकेट आणि शादाब खानने 4 षटकात 25 धावा देत 2 विकेट घेतल्या. पाकिस्तानकडून साहिबजादा फरहान आणि सईम अयुबने चांगली सुरुवात करून दिली. पहिल्या विकेटसाठी 59 धावांची भागीदारी केली. साहिबजादा फरहानने 36 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकार मारत 51 धावा केल्या. श्रीलंकेकडून महेश थीक्षाना, दुष्मंथआ चामीरा, वानिंदू हसरंग आणि धनंजय डीसिल्वा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
पाकिस्तानचा कर्णधार सलमान आगाने सांगितलं की, ‘ दिवसाच्या सुरुवातीला हवामान खराब असल्याने मला दव पडण्याची अपेक्षा नव्हती. दुसऱ्या डावातील पहिल्या 5-6 षटकांनंतर भरपूर दव पडला होता. पहिल्या डावात चेंडू कसा टिकून होता हे पाहता 150 धावांची धावसंख्या आव्हानात्मक असेल असे मला वाटले. पण दुसऱ्या डावात दव पडल्यानंतर मला वाटले की 170 धावांची गरज आहे. विश्वचषकात आपल्याला काय करायचे आहे हे आपल्याला माहिती आहे. आपल्याला आपल्या भूमिका माहित आहेत. मला संघाने चांगले क्षेत्ररक्षण करावे असे वाटते. त्या क्षेत्रात आपल्याला सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. मला फूल टॉस खेळण्यावर काम करावे लागेल, ती एक कमकुवत बाजू ठरली आहे.’
