T20i World Cup 2026 : बांगलादेशचा पत्ता कट करताच पाकिस्तान वठणीवर, शिस्तीत वर्ल्ड कपसाठी टीम जाहीर

Pakistan Squad For Icc T20i World Cup 2026: पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने अखेर आयसीसी वर्ल्ड कप 2026 स्पर्धेसाठी संघाची घोषणा केली आहे. पाकिस्तानने बांगलादेशसाठी आडमुठी भूमिका घेतली होती. मात्र आयसीसीच्या इशाऱ्यानंतर पीसीबीने एक पाऊल मागे घेतलंय.

T20i World Cup 2026 : बांगलादेशचा पत्ता कट करताच पाकिस्तान वठणीवर, शिस्तीत वर्ल्ड कपसाठी टीम जाहीर
Pakistan Cricket Team
Image Credit source: Hagen Hopkins/Getty Images
| Updated on: Jan 25, 2026 | 1:41 PM

बांगलादेशने भारतात होणाऱ्या आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेवर सुरक्षेच्या कारणाने बहिष्कार घातला. आयसीसीने बीसीबी अर्थात बांगलादेश क्रिकेट बोर्डाला खेळाडूंच्या सुरक्षिततेचं आश्वासन दिलेलं. मात्र त्यानंतरही बीसीबीने बांगलादेशचे वर्ल्ड कप स्पर्धेतील सामने श्रीलंकेत खेळवण्याची विनंती केलेली. मात्र आयसीसीने बीसीबीची ही मागणी फेटाळून लावली आणि त्यांचा स्पर्धेतून पत्ता कट केला. आयसीसीने बांगलादेशच्या जागी स्कॉटलँड क्रिकेट टीमला संधी दिलीय.

आयसीसीने बांगलादेशला हिसका दिल्यानंतर पाकिस्तानने शिस्तीत वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर केला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने वर्ल्ड कप स्पर्धेत जोवर बांगलादेश खेळणार नाही तोपर्यंत आपणही सहभागी होणार नसल्याची भूमिका घेतल्याचा दावा करण्यात आलेला. मात्र आयसीसीने पाकिस्ताला या स्पर्धेत खेळावंच लागेल अन्यथा कारवाईला सामोरं जावं लागण्याचा थेट इशारा दिला होता. त्यानुसार आयसीसीने पाकिस्तानवर अनेक बाबतीत प्रतिबंध घालण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे पीसीबीची अनेक बाबतीत आर्थिक कोंडी झाली असती. मात्र आयसीसीने डोळे वटारताच बॅकफुटवर जात पाकिस्तानने शिस्तीत वर्ल्ड कप स्पर्धेसाठी संघ जाहीर केला आहे.

पाकिस्तानने या 10 व्या टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेसाठी 15 सदस्यीय संघ जाहीर केलाय. सलमान आगा आणि आकिब जावेद यांनी एकत्र या स्पर्धेसाठी खेळाडूंची नावं जाहीर केली. सलमान आघा पाकिस्तानचं नेतृत्व करणार आहे. तसेच या स्पर्धेसाठी वेगवान गोलंदाज हरिस रौफ याला डच्चू देण्यात आला आहे. तसेच मोहम्मद रिझवान यालाही वगळण्यात आलंय. मात्र निवड समितीने अनुभवी फलंदाज आणि माजी कर्णधार बाबर आझम याला संधी दिली आहे.

पाकिस्तानची वर्ल्ड कप मोहिम

पाकिस्तानचा या स्पर्धेसाठी ए ग्रुपमध्ये समावेश करण्यात आला आहे. पाकिस्तानशिवाय या ग्रुपमध्ये टीम इंडिया, नेदरलँड्स, नामिबिया आणि यूएसएचा समावेश आहे. पाकिस्तान या मोहिमेतील आपला पहिला सामना स्पर्धेतील पहिल्याच दिवशी 7 फेब्रुवारीला खेळणार आहे. पाकिस्तान नेदरलँड्स विरुद्ध भिडणार आहे. पाकिस्तान आपले सर्व सामने हे श्रीलंकेतच खेळणार आहे. श्रीलंकेकडे या वर्ल्ड कप स्पर्धेचं सहयजमानपद आहे.

पाकिस्तानचं वर्ल्ड कप स्पर्धेतील वेळापत्रक

विरुद्ध नेदरलँड्स, 7 फेब्रुवारी

विरुद्ध यूएसए, 10 फेब्रुवारी

विरुद्ध टीम इंडिया, 15 फेब्रुवारी

विरुद्ध नामिबिया, 18 फेब्रुवारी

वर्ल्ड कपसाठी पाकिस्तान टीम जाहीर

आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2026 स्पर्धेसाठी पाकिस्तान क्रिकेट टीम : सलमान अली आगा (कर्णधार), अबरार अहमद, बाबर आझम, फहीम अश्रफ, फखर जमान, ख्वाजा मोहम्मद नाफे (विकेटकीपर), मोहम्मद नवाज, मोहम्मद सलमान मिर्झा, नसीम शाह, साहिबजादा फरहान (विकेटकीपर), सॅम अयुब, शाहीन शाह आफ्रिदी, शादाब खान, उस्मान खान आणि उस्मान तारिक.