Ranji Trophy : शार्दुल ठाकुर-अजिंक्य रहाणे आणि सूर्यकुमार यादवची कमाल, मुंबईने गाठली उपांत्य फेरी
रणजी स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत मुंबईने हरियाणाला 152 धावांनी पराभूत केलं आणि उपांत्य फेरीत धडक मारली आहे. मुंबईकडून चमकदार कामगिरी करणाऱ्या शार्दुल ठाकुरला सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.

रणजी स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीचा सामना मुंबई विरुद्ध हरियाणा यांच्यात रंगला. या सामन्यात नाणेफेकीचा कौल मुंबईच्या बाजूने लागला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या डावात मुंबईची सुरुवात निराशाजनक झाली. पण मधल्य़ा फळीतल्या शम्स मुलानी आणि शेवटच्या तनुष कोटियन यांनी डाव सावरला. पहिल्या डावात मुंबईचा संघ बॅकफूटवर होता. 25 धावांवर मुंबईने 4 गडी गमावले होते. शम्स मुलानीने 178 चेंडूत 91, तर तनुष कोटियनने 173 चेंडूत 97 धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीमुळे मुंबईने 315 धावांपर्यंत मजल मारली. पहिल्या डावात हरियाणानेही चांगली सुरुवात केली. त्यामुळे हरियाणा 315 आकडा आरामात गाठेल असं वाटत होतं. पण शार्दुल ठाकुरच्या भेदक गोलंदाजीमुळे हरियाणाचा डाव 301 धावांवर आटोपला आणि मुंबईला 14 धावांची आघाडी मिळाली. मुंबईने यापुढे खेळताना सर्व गाडी गमवून 339 धावा केल्या आणि विजयासाठी 353 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान काही हरियाणाला गाठता आलं नाही. हरियाणाचा संघ 201 धावा करू शकला आणि मुंबईने 152 धावांनी विजय मिळवला.
दुसऱ्या डावात मुंबईकडून कर्णधार अजिंक्य रहाणे याची बॅट तळपली. त्याने 180 चेंडूत 13 चौकारांच्या मदतीने 108 धावा केल्या. तर सूर्यकुमार यादवलाही सूर गवसल्याचं दिसलं. त्याने 86 चेंडूत 8 चौकार आणि 2 चौकाराच्या मदतीने 70 धावा केल्या. दुसऱ्या डावात मुंबईकडून गोलंदाजी करतना रॉयस्टन डायस याने 5 विकेट घेतल्या. तर शार्दुल ठाकुरला 3 विकेट घेण्यात यश मिळालं. तसेच तनुष कोटियन याने 2 गडी बाद केले. 354 धावांचा पाठलाग करताना हरियाणाची फलंदाजी घसरली. लक्ष्य दलालने 64 आणि सुमित कुमारने 62 धावा केल्या. या व्यतिरिक्त एकही फलंदाज चांगली कामगिरी करू शकला नाही. 7 फलंदाजांना तर दुहेरी आकडाही गाठता आला नाही.
दोन्ही संघाची प्लेइंग 11
हरियाणा (प्लेइंग इलेव्हन): लक्ष्य दलाल, यशवर्धन दलाल, अंकित कुमार (कर्णधार), हिमांशू राणा, निशांत सिंधू, रोहित परमोद शर्मा (विकेटकीपर), जयंत यादव, सुमित कुमार, अंशुल कंबोज, अनुज ठकराल, अजित चहल.
मुंबई (प्लेइंग इलेव्हन): आयुष म्हात्रे, आकाश आनंद (विकेटकीपर), सिद्धेश लाड, अजिंक्य रहाणे (कर्णधार), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, शम्स मुलाणी, शार्दुल ठाकूर, तनुष कोटियन, मोहित अवस्थी, रॉयस्टन डायस
