Ranji Trophy : मोहम्मद शमीने 10 षटकात केला खेळ खल्लास, एकट्याने अर्धा संघ तंबूत पाठवला

रणजी ट्रॉफी 2025-2026 स्पर्धेत बंगाल विरुद्ध गुजरात सामना झाला. या सामन्यात बंगालने गुजरातला 141 धावांनी पराभूत केलं. या विजयाचा शिल्पकार ठरला तो वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी...

Ranji Trophy : मोहम्मद शमीने 10 षटकात केला खेळ खल्लास, एकट्याने अर्धा संघ तंबूत पाठवला
Ranji Trophy : मोहम्मद शमीने 10 षटकात केला खेळ खल्लास, एकट्याने अर्धा संघ तंबूत पाठवला
Image Credit source: PTI
| Updated on: Oct 28, 2025 | 5:12 PM

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेनंतर मोहम्मद शमी टीम इंडियात जागा मिळवण्यासाठी धडपड करत आहे. यासाठी मोहम्मद शमी रणजी ट्रॉफी स्पर्धेत चांगलाच घाम गाळत आहे. बीसीसीआयच्या निवड समितीचं लक्ष वेधून घेण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहे. मोहम्मद शमीने रणजी ट्रॉफीच्या दुसऱ्या सामन्यात जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन केलं. त्यामुळे त्याच्या कामगिरीची दखल बीसीसीआय निवड समितीला घेणं भाग आहे. रणजी ट्रॉफी स्पर्धेत बंगाल आणि गुजरात हे संघ आमनेसामने आले होते. नाणेफेकीचा कौल गुजरातच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बंगालने पहिल्या डावात 279 धावांची खेळी केली. त्यानंतर गुजरातचा डाव फक्त 167 धावांवर आटोपला. पहिल्या डावात बंगालकडे 112 धावांची आघाडी होती. दुसऱ्या डावात बंगालने 8 गडी गमवून 214 धावांवर डाव घोषित केला आणि विजयासाठी 326 धावांचं आव्हान दिलं. पण गुजरातचा संग 185 धावांवरच गारद झाला. बंगालने हा सामना 141 धावांनी जिंकला. या विजयाची शिल्पकार ठरला तो मोहम्मद शमी…

मोहम्मद शमीने या सामन्यात एकूण 8 विकेट तंबूत धाडले. दुसऱ्या डावात 10 षटकात गुजरातचा निम्मा संघ बाद केला. मोहम्मद शमीने पहिल्या डावात 18.3 षटकं टाकत 44 धावा देत 3 गडी बाद केले. तर दुसऱ्या डावात 10 षटकं टाकत 38 धावा देत 5 गडी तंबूत पाठवले. मोहम्मद शमीने रणजी ट्रॉफीत खेळलेल्या दोन सामन्यात एकूण 15 विकेट घेतल्या आहेत. यापूर्वी उत्तराखंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात 7 गडी बाद केले होते. मोहम्मद शमीने या कामगिरीतून फिट अँड फाईन असल्याचा संदेश भारतीय निवड समितीला दिला आहे. त्यामुळे त्याला संघातून वगळणं वाटतं तितकं सोपं नाही.

दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत संधी मिळणार?

दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत मोहम्मद शमीला संधी मिळू शकते. दक्षिण अफ्रिकेने संघाची घोषणा केली आहे. मात्र अजूनही भारतीय संघाची घोषणा झालेली नाही. भारत दक्षिण अफ्रिका पहिला कसोटी सामना 14 नोव्हेंबरला होणार आहे. हा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डनवर होईल. याच मैदानात मोहम्मद शमीने 15 गडी बाद केले आहेत. त्यामुळे मोहम्मद शमीची निवड भारतीय संघात होण्याची शक्यता वाढली आहे. दरम्यान, निवड समिती सदस्य आरपी सिंह याने मोहम्मद शमीची हा सामना सुरु असताना भेट घेतली होती. त्यामुळे संघात निवड होण्याची शक्यता वाढली आहे.