RCB vs LSG : लखनौकडे आरसीबीचा हिशोब करण्याची संधी, गतविजेत्या बंगळुरुला लोळवणार?

Royal Challengers Bengaluru vs Lucknow Super Giants : रजत पाटीदार याच्या नेतृत्वात आरसीबीने लखनौ विरुद्ध गेल्या मोसमात (IPL 2025) 220 पेक्षा अधिक धावांचा यशस्वी पाठलाग करत एकतर्फी फरकाने सामना जिंकला होता.

RCB vs LSG : लखनौकडे आरसीबीचा हिशोब करण्याची संधी, गतविजेत्या बंगळुरुला लोळवणार?
Jitesh Sharma and Rishabh Pant RCB vs LSG IPL
Image Credit source: Bcci
| Updated on: Apr 15, 2026 | 3:31 AM

आयपीएल 2026 स्पर्धेत ऋषभ पंत याच्या नेतृत्वात लखनौ सुपर जायंट्ससमोर गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचं आव्हान असणार आहे. हा सामना बंगळुरुचं होम ग्राउंड असलेल्या एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये होणार आहे. लखनौकडे या सामन्यात विजय मिळवून गेल्या मोसमातील पराभवाची परतफेड करण्याची संधी असणार आहे. लखनौला गेल्या हंगामात (IPL 2025) आरसीबीकडून 220 पेक्षा अधिक धावा करुनही पराभूत व्हावं लागलं होतं. त्यामुळे लखनौ या पराभवाचा हिशोब करणार की गतविजेता आपली घोडदौड कायम राखत चौथा विजय साकारणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हेड टु हेड आकडेवारी

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स यांच्यात एकूण 6 वेळा आमनासामना झाला आहे. आरसीबीने या 6 पैकी सर्वाधिक 4 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर लखनौने 2 वेळा आरसीबीवर मात केली आहे.

गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपर जायंट्सचं 2022 साली आयपीएल स्पर्धेत पदार्पण झालं होतं. बंगळुरुने लखनौला त्यांच्या पदार्पणातील हंगामात दोन्ही सामन्यांत पराभूत केलं. त्यानंतर लखनौने 2023 साली आपल्या कामगिरीत सुधारणा केली. उभयसंघात 2022 नंतर 2023 मध्येही दोनदा आमनासामना झाला. दोन्ही संघांनी प्रत्येकी 1-1 सामना जिंकला. तसेच 2024 साली लखनौने आरसीबीचा धुव्वा उडवला होता. लखनौने आरसीबीवर 24 धावांनी विजय मिळवला होता.

2025 मध्ये काय झालं होतं?

लखनौ विरुद्ध बंगळुरु यांच्यात 18 व्या मोसमात (IPL 2025) एकदा आमनासामना झाला. लखनौला या सामन्यात 227 धावा करुनही पराभूत व्हावं लागलं होतं. लखनौने कॅप्टन ऋषभ पंत याने केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर 20 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 227 रन्स केल्या होत्या. मात्र आरसीबीने 228 धावांचं आव्हान 8 बॉलआधी 4 विकेट्स गमावून पूर्ण केलं होतं. आरसीबीने 18.4 ओव्हरमध्ये 4 विकेट्सच्या मोबदल्यात 230 धावा केल्या होत्या.

आरसीबीसाठी मंयक अग्रवाल आणि हंगामी कर्णधार जितेश शर्मा या जोडीने पाचव्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली होती. मयंक आणि जितेश या दोघांनी 45 बॉलमध्ये 107 रन्सची नॉट आऊट पार्टनरशीप करुन आरसीबीला विजयी केलं होतं. आरसीबीला आपल्या नेतृत्वात जबरदस्त विजय मिळवून देणारा जितेश शर्मा सामनावीर ठरला होता. जितेशने 33 बॉलमध्ये नॉट आऊट 85 रन्स केल्या होत्या. त्यामुळे आता लखनौ गेल्या मोसमातील पराभवाचा हिशोब करणार की आरसीबी चौथा विजय मिळवणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us