ऋषभ पंतला अखेर ग्रीन सिग्नल, आयपीएल 2024 स्पर्धेत मिळणार महत्त्वाची जबाबदारी
गेल्या वर्षभरापासून ऋषभ पंतबाबत चर्चा सुरु होत्या. अपघात झाल्यापासून मैदानात कधी परतणार याबाबत चर्चांना उधाण आलं होतं. अखेर या सर्व चर्चांना पूर्णविराम लागला आहे. कारण बीसीसीआयने ऋषभ पंतला हिरवा कंदील दिला आहे. इतकंच काय तर महत्त्वाची भूमिका बजवण्यासही सक्षम असणार आहे.

मुंबई : आयपीएल 2024 स्पर्धा सुरु होण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. तत्पूर्वी दिल्ली कॅपिटल्स आणि ऋषभ पंतच्या चाहत्यांना आनंदाची बातमी मिळाली आहे. डिसेंबर 2022 मध्ये अपघात झाल्यानंतर ऋषभ पंत मैदानापासून दूर होता. आयपीएल 2023 स्पर्धा आणि वनडे वर्ल्डकप स्पर्धेलाही मुकला होता. तो मैदानात परतणार की नाही? याबाबतही चर्चा रंगल्या होत्या. आता या सर्व चर्चांना पूर्णविराम लागला असून ऋषभ पंत मैदानात परतण्यास सज्ज झाला आहे. बीसीसीआयने ऋषभ पंतला आयपीएल खेळण्यास फिट असल्याचं सांगितलं आहे. 30 डिसेंबर 2022 ला दिल्लीहून आपल्या घरी डेहरादूनला जात असताना ऋषभ पंतचा भीषण अपघात झाला होता. त्या अपघातातून सुदैवाना बचावला आणि 14 महिने मैदानापासून दूर होता. त्यानंतर त्याच्या गुडघ्यावर यशस्वी शस्त्रक्रिया झाली आणि आता फिट अँड फाईन असून क्रिकेटच्या मैदानात उतरण्यास सज्ज आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने 12 मार्च 2024 रोजी ऋषभ पंत, वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा आणि मोहम्मद शमीच्या फिटनेसबाबत अपडेट दिलं आहे. यात पंत एकदम फिट असल्याचं सांगण्यात आलं आहे. दुसरीकडे, मोहम्मद शमी आणि प्रसिद्ध कृष्णा आयपीएल खेळणार नसल्याचंही स्पष्ट केलं आहे. ऋषभ पंतबाबत बोर्डाने सांगितलं की, “30 डिसेंबर ला उत्तराखंडच्या रुडकी येथे रस्ते अपघातानंतर 14 महिने रिहॅब आणि रिकव्हरी प्रोसेसमधून गेल्यानंतर ऋषभ पंत आता आयपीएलमध्ये विकेटकीपर फलंदाज म्हणून फिट असल्याचं घोषित केलं जात आहे.”
ऋषभ पंत विकेटकीपर फलंदाज म्हणून फिट असल्याने दिल्ली कॅपिटल्सला फायदा होणार आहे. ऋषभ पंत या स्पर्धेत कर्णधारपद आणि विकेटकीपिंग करताना दिसू शकतो. पण याबाबत अजूनही फ्रेंचायसीने काहीही सांगितलेले नाही. पॉटिंगनेही स्पष्ट केलं आहे की, जर पंत पूर्ण स्पर्धेत फिट असेल तर नक्कीच कर्णधार असेल. पण तसं झालं नाही तर मात्र पर्याय शोधावा लागेल. दरम्यान, दिल्ली कॅपिटल्सची 2023 स्पर्धेतील कामगिरी निराशाजनक होती. ऋषभ पंतची उणीव यावेळी वारंवार भासली.
