
आयपीएल 2025 स्पर्धेत पंजाब किंग्सला टॉप 2 मध्ये पोहोचवण्यात कर्णधार श्रेयस अय्यरचं मोठं योगदान आहे. मागच्या वर्षी केकेआरला जेतेपद मिळवून दिल्यानंतर अय्यरपुढे मोठं आव्हान होतं. कोट्यवधींची बोली लावून पंजाब किंग्सने त्याला संघात घेतलं आणि कर्णधारपदही दिलं. इतक्या साऱ्या जबाबदाऱ्या आणि लिलावात मिळालेल्या पैशांचं ओझं असताना श्रेयस अय्यर काही डगमगला नाही. त्याने पंजाब किंग्सला टॉप 2 मध्ये आणून दाखवलं. पंजाब किंग्स 2014 नंतर पहिल्यांदाच टॉप 2 मध्ये पोहोचली आहे. आता क्वॉलिफायर 1 चा सामना जिंकून अंतिम फेरी गाठण्याचा स्पष्ट हेतू आहे. पण असं सर्व असताना माजी क्रिकेटपटू श्रेयस अय्यरच्या वक्तव्याने खळबळ उडाली आहे. कोलकाता नाईट रायडर्सला जेतेपद मिळवून दिल्यानंतर त्याच्या कामगिरीकडे दुर्लक्ष केल्याचा घणाघाती आरोप केला आहे. इतकंच काय तर टीम इंडियात कधी आत तर कधी बाहेर असतो. त्यामुळे रॉबिन उथप्पाच्या वक्तव्यामुळे श्रेयस अय्यरच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
जियोहॉटस्टारशी बोलताना रॉबिन उथप्पाने सांगितलं की, ‘या पर्वात पंजाब किंग्सच्या जबरदस्त कामगिरीचं श्रेय अय्यरला जातं. त्याने संघात समतोलपणा आणला. तसेच संघाला लढण्याचं बळ दिलं.’ उथप्पाने पुढे सांगितलं की, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात कोलकाता नाईट रायडर्सने मागच्या पर्वात जेतेपद मिळवलं होतं. पण असं असूनही त्याला रिलीज केलं. इतका मोठा अन्याय त्याचा असू शकत नाही. पण तो अशा संघात गेला जिथे त्याला साध्य करण्यासाठी बरंच काही होतं. श्रेयस अय्यर उत्तम फॉर्मात आहे. पण असं असूनही त्याला कसोटी संघात स्थान मिळालं नाही, याबाबतही रॉबिन उथप्पाने खंत व्यक्त केली.
इंग्लंड दौऱ्यावर पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी टीम इंडिया पुढच्या महिन्यात जाणार आहे. यासाठी शुबमन गिलच्या नेतृत्वात संघाची घोषणा केली आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या गैरहजेरीत हा दौरा आहे. त्यामुळे विराट कोहलीचा पर्याय म्हणून चाहते अय्यरकडे पाहात होते. अय्यरने देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली. तसेच चॅम्पियन्स ट्रॉफीतही फलंदाजीत कमाल केली. मात्र असं असून त्याला कसोटी संघातून डावलण्यात आलं.