रोहित शर्माने कसोटी फॉर्मेटमधून निवृत्ती घेण्याचं कारण काय? त्यानेच खरं काय ते सांगून टाकलं
टीम इंडियाचा दिग्गज क्रिकेटपटू रोहित शर्माने टी20 नंतर कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्याने अचानक निवृत्ती घेतल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. पण रोहित शर्माने त्याबाबत मोठा खुलासा केला आहे. त्यामुळे चाहते या निवृत्तीकडे वेगळ्या अंगाने पाहात आहेत.

इंग्लंड दौऱ्यापूर्वी रोहित शर्मा आणि विराट कोहलीने कसोटीतून निवृत्ती घेतल्याने खळबळ उडाली होती. आयपीएल स्पर्धा सुरु असताना त्यांनी असा निर्णय घेत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. इंग्लंड कसोटी मालिका तोंडावर असताना हा निर्णय आश्चर्यकारक वाटला होता. यापूर्वी रोहित शर्मा आणि विराट कोहलीने टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला होता. आता दोघेही फक्त वनडे सामने खेळताना दिसणार आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून हे दोघेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत हे दिग्गज क्रिकेटपटू पुन्हा खेळताना दिसू शकतात. असं असताना रोहित शर्मा एका कार्यक्रमात दिसला. यावेळी त्याने कसोटी क्रिकेटमधील एक अनुभव शेअर केला. यावेळी कसोटीतील मानसिक आणि शारीरिक त्रासाबाबत मत मांडलं. तसेच आव्हानात्मक असल्याचं सांगितलं. त्यामुळे चाहते या वक्तव्याचा आपल्या पद्धतीने अर्थ बांधत आहेत. रोहित मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या थकल्याचा अर्थ क्रीडाप्रेमी घेत आहेत.
रोहित शर्माने कसोटी फॉर्मेटबाबत सांगितलं की, ‘कसोटी क्रिकेट एक असा फॉर्मेट आहे जिथे तु्म्हाला तयारी करावी लागते. कारण या फॉर्मेटमध्ये तुम्हाला दीर्घकाळ मैदनात राहावं लागतं. कसोटीत पाच दिवस खेळावं लागतं. त्यामुळे मानसिकदृष्ट्या आव्हानात्मक असते. तसेच थकवा देणारं असतं. पण सर्व क्रिकेटर फर्स्ट क्लास क्रिकेट खेळून मोठे झाले आहेत. जेव्हा स्पर्धात्मक क्रिकेट खेळणं सुरु करतो, इतकंत काय तर मुंबईच्या क्लब क्रिकेटचे सामनेही दोन ते तीन दिवस चालतात. आम्ही लहानपणापासूनच यासाठी तयार असतो. यामुळे भविष्यातील स्थितीचा सामना करणं सोपं होतं.’
‘लहान असताना तुम्हाला तयारीचं महत्त्व समजत नाही. पण खेळत असताना एक शिस्त लागते. या सुरुवात तयारीने होते. हे समजून घेणं खूपच आवश्यक आहे. जेव्हा तुम्ही लांब फॉर्मेट खेळता तेव्हा तुम्हाला अधिकची मेहनत घ्यावी लागते. तसेच एकाग्रता महत्त्वाची असते. चांगल्या कामगिरीची अपेक्षा असते. त्यामुळे तुम्हाला मानसिकदृष्ट्या सक्षम असणं गरजेचं आहे. मी मुंबईकडून खेळायला सुरुवात केली. नंतर भारताकडून खेळताना माझ्यासोबतही असंच घडले. माझं लक्ष आणि वेळ मी कशी तयारी करतो यावर होतो.’, असं रोहित शर्मा पुढे म्हणाला.
