W,W,W… बांगलादेशविरुद्ध हॅटट्रीक घेऊनही वेस्ट इंडिजला बॉलरला काही कळलंच नाही, मग झालं असं की…
वेस्ट इंडिज आणि बांग्लादेश यांच्यात वनडे आणि टी20 मालिका पार पडली. वनडे मालिकेत बांगलादेशने वेस्ट इंडिजला 2-1 ने पराभूत केलं. पण टी20 मालिकेत वेस्ट इंडिजने बांगलादेशला क्लिन स्वीप देत मालिका खिशात घातली. तिसऱ्या टी20 सामन्यात एक अनोखी हॅटट्रीक पाहायला मिळाली.

वेस्ट इंडिज आणि बांग्लादेश यांच्यात तीन सामन्यांची टी20 मालिका पार पडली. या मालिकेत वेस्ट इंडिजने बांगलादेशला धोबीपछाड देत मालिका 3-0 ने खिशात घातली. तिसऱ्या टी20 सामन्यात नाणेफेकीचा कौल बांगलादेशने जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशने 20 षटकात सर्व गडी गमवून 151 धावा केल्या आणि विजयासाठी 152 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान वेस्ट इंडिजने 16.5 षटकात 5 गडी गमवून पूर्ण केलं. या विजयाचा शिल्पकार ठरला तो वेस्ट इंडिजचा गोलंदाज रोमारियो शेफर्ड… पहिल्या तीन षटकातील 17 चेंडूत 27 धावा दिल्या होत्या. पण तिसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूपासून नशिब पालटलं. दोन षटकात मिळून हॅटट्रीक घेतली आणि अशी कामगिरी करणारा वेस्ट इंडिजचा दुसरा गोलंदाज ठरला आहे. पण त्याने हॅटट्रीक घेऊनही त्याला याबाबत माहिती नव्हतं हे विशेष…
वेस्ट इंडिजकडून 17वं षटक टाकण्यासाठी रोमारियो शेफर्ड आला होता. या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर नुरूल हसन याला बाद केलं. त्यानंतर रोमारियो शेफर्ड शेवटचं षटक टाकण्याची संधी मिळाली. या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर रोमारियोने तन्झीद हसनला बाद केला. इतकंच काय तर त्याला शतक करण्यापासून रोखलं. त्यानंतर पुढच्या चेंडूवर शोरीफुल इस्लामला यॉर्कर टाकून तंबूचा रस्ता दाखवला. यासह त्याने दोन षटकात हॅटट्रीक पूर्ण केली. पण सेलीब्रेशन करण्याऐवजी शेफर्ड गोलंदाजी करण्यासाठी परतत होता. तेव्हा इतर खेळाडूंना त्याला जवळ जाऊन सांगितलं. त्यानंतर त्याने आनंद साजरा केला. अष्टपैलू जेसन होल्डरनंतर टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हॅटट्रीक घेणारा रोमारियो शेफर्ड दुसरा गोलंदाज आहे.
रोमारियो शेफर्डने सामन्यानंतर सांगितलं की, ‘हॅटट्रिक होईपर्यंत मला खरंच माहित नव्हतं की मी हॅटट्रिकवर आहे. मी डाव संपवण्यावर जास्त लक्ष केंद्रित करत होतो. जेसन बाहेर आला आणि मला म्हणाला की ही हॅटट्रिक आहे आणि मला चार चेंडूत चार विकेट घेण्यास सांगितले. जेव्हा तुम्ही एक तरुण वेगवान गोलंदाज असता, तेव्हा तुम्ही इतरांना स्टंप ओव्हर ठोकताना पाहता आणि तुम्हीही तेच करण्याचे स्वप्न पाहता. शेवटी त्या क्लबमध्ये सामील होणे चांगले वाटते.’
