
आयपीएल 2025 स्पर्धेत गेल्या अनेक वर्षांपासूनचं जेतेपदाचं स्वप्न अखेर पूर्ण झालं. त्यामुळे इतक्या वर्षानंतर आनंदाला उधाण आलं होतं. चाहतेही आपल्या संघाच्या विजयाच्या जल्लोष भारावून गेले होते. 3 जून रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने पंजाब किंग्सला पराभूत केलं आणि जेतेपदावर नाव कोरलं. पण दुसर्या दिवशी या आनंदावर विरजन पडलं. कारण 4 जूनच्या विजयी परेडमध्ये चेंगराचेंगरी झाली आणि 11 लोकांना जीव गमवावा लागला. तर 50 हून अधिक जण जखमी झाले. या प्रकरणी गेल्या तीन महिन्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत होत्या. पण आरसीबी फ्रेंचायझीने मौन बाळगलं होतं. कोर्टाने देखील या प्रकरणी आपलं निरीक्षण नोंदवलं आहे. असं असताना तीन महिन्यानंतर आरसीबीने भावनिक पोस्ट केली आहे. यात त्यांनी लिहिलं की, 3 जूनला आम्ही खूप खुश होतो, पण 4 जूनमुळे सगळं काही बदललं. विजयानंतर आरसीबीचा संघ 4 जूनला बंगळुरु शहरात परतला होता. यावेळी एम चिन्नस्वामी स्टेडियममध्ये विजयी परेडचं आयोजन केलं होतं. पण रेकॉर्डब्रेक गर्दी झाली आणि चेंगराचेंगरी झाली.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने सोशल मिडिया पोस्टमध्ये लिहिलं की, ‘आमचं शांत असणं दु:ख होतं. ही जागा कधी एनर्जी, आठवणी आणि त्या आनंददायी क्षणांनी भरलेली होती. त्याचा तुम्ही सर्वात जास्त आनंद घेतला. पण 4 जूनच्या प्रकरणामुळे सर्व काही बदललं. त्या दिवसानंतर शांततेने आपली जागा बनवली होती. या शांततेत आम्ही शोक करत होतो. ऐकत होतो आणि शिकत होतो. हळूहळी आम्ही एका प्रतिक्रियेपेक्षा काहीतरी बनू लागलो. आता ती अशी गोष्ट आहे ज्यावर आम्ही खरोखर विश्वास ठेवतो. ‘
‘आरसीबी केअर्स अस्तित्वात आले. त्याचा जन्म आदर देण्याबरोबरच उपचार करण्याच्या आणि आमच्या चाहत्यांसह उभे राहण्याच्या उद्देशाने झाला. आम्ही आता आमच्या चाहत्यांसह उत्सव साजरा करण्याऐवजी काळजी घेऊन पुढे जात आहोत.आरसीबी केअर्स कर्नाटकचा अभिमान बनणार आहे आणि आम्ही नेहमीच असेच करत राहू.’, असंही आरसीबीने पुढे लिहिलं आहे. या अजून डिटेल्स लवकरच देऊ असं सांगितलं आहे. दरम्यान, 4 जूनच्या चेंगराचेंगरीनंतर आरसीबीने प्रत्येक मृतांच्या नातेवाईकांना 10 लाख रुपयांची मदत केली आहे.