
भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात 9 डिसेंबरपासून टी20 मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना कटकचया बाराबाती स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे. या मालिकेत विजयी आघाडी घेण्यासाठी टीम इंडिया सज्ज आहे. असं असताना कर्णधार सूर्यकुमार यादवने एक हिंट दिली आहे. त्यामुळे संजू सॅमसनच्या चाहत्यांना आतापासूनच घाम फुटला आहे. सुर्यकुमार यादवने सांगितलं की, शुबमन गिल फिट आहे आणि पहिल्या सामन्यात खेळण्यास तयार आहे. असं सांगताना सूर्यकुमार यादवने संजू सॅमसनबाबत एक हिंट दिली. त्यामुळे त्याच्या चाहत्यांचा हिरमोड झाला आहे. सूर्यकुमार यादवने संकेत दिले की, प्लेइंग 11 मध्ये जास्त काही बदल करणार नाही. सूर्यकुमार यादव आपल्या वक्तव्यावर ठाम राहिला तर संजू सॅमसनला प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा मिळणं कठीण आहे. कारण मागच्या तीन टी20 सामन्यात त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली नव्हती.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात सुरुवातीच्या दोन टी20 सामन्यात संजू सॅमसनला संधी मिळाली होती. त्यानंतरच्या तीन सामन्यात त्याला बेंचवर बसावं लागलं होतं. त्याच्या ऐवजी संघात जितेश शर्माला संधी मिळाली होती. जितेश शर्माला एक फिनिशर म्हणून संघात स्थान मिळालं होतं. सूर्यकुमार यादवने सांगितलं की, ‘शुबमन गिलने श्रीलंका मालिकेत ओपनिंग केली होती. संजू सॅमसनला टॉप ऑर्डरमध्ये संधी मिळाली होती. तो कुठेही खेळू शकतो. आम्ही प्लेइंग 11 मध्ये फार काही बदल करू इच्छित नाही. आम्ही आहे तसंच ठेवू. आम्ही प्लेइंग 11 मध्ये फार काही बदल करायचा नाही असं ठरवलं आहे. पुढच्या दोन मालिकांमध्ये आम्ही बदल करणार नाही.’ सूर्यकुमार यादवचं वक्तव्य पाहता संजू सॅमसनला प्लेइंग 11 मध्ये संधी मिळणं कठीण आहे. कारण ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील मागच्या तीन टी20 सामन्यात खेळला नव्हता.
देशांतर्गत सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2025 स्पर्धेत संजू सॅमसनने चांगली कामगिरी केली. त्याने 6 डावात 58.25 च्या सरासरीने 233 धावा केल्या. यात त्याने 11 षटकार आणि 21 चौकार मारले. सॅमसन फॉर्मात असूनही त्याला संधी मिळाली नाही तर पुन्हा एकदा सोशल मीडियावर त्याचे चाहते रान पेटवतील. आता पाच पैकी किती सामन्यात त्याला संधी मिळते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.