
कोलकाता नाईट रायडर्स फ्रँचायजीने बीसीसीआयच्या आदेशानंतर त्यांच्या टीममधील बांगलादेशी खेळाडू मुस्तफिजूर रहमान याला रिलीज केलं. बांगलादेशमधील हिंसाचारानंतर बीसीसीआयने केकेआरला मुस्तफिजूरला रिलीज करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर केकेआरने मुस्तफिजूरला टीममधून बाहेरचा रस्ता दाखवला. तेव्हापासून बांगलादेशला क्रिकेट बोर्डाला भारतात खेळणं अचानक असुरक्षित वाटायला लागलं. याच असुरक्षितेतचा बहाणा सांगत बांगलादेश क्रिकेट बोर्डाने भारतात होणाऱ्या टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत खेळण्यास नकार दिलाय. बीसीबीने आयसीसीकडे त्यांचे वर्ल्ड कप स्पर्धेतील सामने त्रयस्थ ठिकाणी आयोजित करण्यात यावे, अशी विनंती केली होती. मात्र आयसीसीने बीसीबीची ही विनंती फेटाळून लावलीय. त्यानंतर बांगलादेशनेही भारतात वर्ल्ड कप स्पर्धेत खेळण्यावर बहिष्कारण घातला आहे. त्यानंतर आता मोठी अपडेट समोर आली आहे. बांगलादेशच्या जागी टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेसाठी एका संघाला संधी मिळणार आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, बांगलादेशच्या जागी स्कॉटलँडला संधी मिळणार असल्याचं म्हटलं जात आहे. याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र बांगलादेशच्या जागी स्कॉटलँडला संधी मिळणार असल्याची शक्यता आहे. स्कॉटलँडला संधी मिळाल्यास त्यांची टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत खेळण्याची ही सलग पाचवी वेळ ठरेल.
स्कॉटलँड युरोपियन क्वालिफायर स्पर्धेतून वर्ल्ड कप स्पर्धेचं तिकीट मिळवण्यात अपयशी ठरली होती. स्कॉटलँड त्या स्पर्धेत चौथ्या स्थानी राहिली होती. मात्र आता स्कॉटलँडचं अचानक नशीब फळफळणार असल्याचं समीकरण पाहायला मिळत आहे. स्कॉटलँडला याआधी 2009 साली टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत खेळण्याची अचानक संधी मिळाली होती. युकेकडे 2009 च्या वर्ल्ड कप स्पर्धेच्या यजमानपदाचा मान होता. मात्र युके आणि झिंबाब्वे यांच्यात राजकीय संघर्ष होते. त्यामुळे झिंबाब्वेने राजकीय संघर्षामुळे आयसीसी टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत खेळण्यास नकार दिला होता.
स्कॉटलँडला टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत काही खास करता आलेलं नाही. स्कॉटलँडने 6 टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत एकूण 22 सामने खेळले आहेत. स्कॉटलँडला त्यापैकी फक्त 7 सामने जिंकता आले आहेत. तर प्रतिस्पर्धी संघांनी स्कॉटलँडला 13 सामन्यांमध्ये पराभूत केलं आहे.
दरम्यान स्कॉटलँडने आतापर्यंत टी 20i क्रिकेटच्या इतिहासात एकूण 109 सामने खेळले आहेत. त्यापैकी स्कॉटलँडने 49 सामने जिंकले आहेत. तर स्कॉटलँडचा 55 सामन्यांमध्ये पराभव झालाय. तर 1 सामना हा टाय झालाय. तर स्कॉटलँडच्या 4 सामन्यांचा निकाल लागला नाही.