आशिया कपमध्ये लाज गेल्यानंतर पाकिस्तान संघात बदल! संघाबाहेर असलेल्या खेळाडूला मिळणार कमान
आशिया कप 2025 स्पर्धेत पाकिस्तानला मानहानीकारक पराभवाला सामोरं जावं लागलं. त्यामुळे संघात बदल होणार हे जवळपास निश्चित आहे. असं असताना टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेपूर्वी कर्णधार बदलणार असल्याचं संकेत मिळत आहेत.

आशिया कप 2025 स्पर्धेत पाकिस्तानची कामगिरी सुमार राहिली. भारताने तिन्ही सामन्यात पाकिस्तानला अक्षरश: चिरडलं. अंतिम सामन्यातही भारताने पाकिस्तानच्या तोंडातून विजयाचा घास खेचून आणला. त्यामुळे पाकिस्तानची नाचक्की झाली. त्यामुळे पाकिस्तान संघात उलथापालथ होणार यात काही शंका नाही. रिपोर्टनुसार, पाकिस्तानचा कर्णधार सलमान आघावर टांगती तलवार आहे. त्याचं कर्णधारपद जाण्याची शक्यता आहे. त्याच्या जागी अष्टपैलू शादाब खानला टी20 संघाची धुरा सोपवली जाण्याची शक्यता आहे. शादाब खान सध्या पाकिस्तान संघाच्या बाहेर आहे. या वर्षीच्या सुरुवातीला त्याच्या खांद्यावर शस्त्रक्रिया झाली होती. त्यामुळे सामन्यांना मुकला होता. आता टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धा तोंडावर आहे. या स्पर्धेपूर्वी त्याच्या खांद्यावर संघाची धुरा सोपवली जाण्याची शक्यता आहे.
पाकिस्तानी मिडियाच्या वृत्तानुसार, अनुभवी अष्टपैलू शादाब खान पुढच्या महिन्यात फिट होईल. तसेच पाकिस्तानी संघात त्याचं पुनरागमन होईल. यावेळी त्याच्याकडे संघाची धुरा सोपवली जाण्याची शक्यता आहे. त्याने 70 वनडे आणि 112 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. शादाब शेवटचा सामना बांगलादेशविरुद्ध खेळला होता. या मालिकेतच त्याच्या खांद्याला दुखापत झाली होती. दुखापत होण्यापूर्वी तो टी20 संघाचा उपकर्णधार होता. शादाब खानकडे कर्णधारपदाचा अनुभवही आहे. यापूर्वी त्याने ही धुरा सांभाळली आहे. पाकिस्तान सुपर लगीमध्येही त्याने ही जबाबदारी पार पाडली आहे.
पुढच्या वर्षी भारत आणि श्रीलंका यांच्याकडे टी20 वर्ल्डकपचं यजमानपद आहे. पाकिस्तानचे सर्व सामने श्रीलंकेत होतील यात काही शंका नाही. या स्पर्धेपूर्वीच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा सलमान आघावरील विश्वास उडाला आहे. कारण कर्णधारपद भूषवताना चुका केल्या. इतकंच काय तर फलंदाजीतही फेल गेला. त्यामुळे त्याच्या खेळीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. सलमान आघा टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फार काही ग्रेट करू शकला नाही. 30 टी20 सामन्यात 23.37 च्या सरासरीने 561 धावा केल्यात. त्याचा स्ट्राईक रेटही 110 आहे. इतकंच काय तर आशिया कप स्पर्धेतील सात सामन्यात 72 धावा केल्या. रिपोर्टनुसार, पाकिस्तान, श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यात टी20 ट्राय सीरिज होणार आहे. यासाठी शादाब खानचा विचार केला जात आहे.
