
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील भारत इंग्लंड उपांत्य फेरीचा सामना कोणीही विसरू शकणार नाही. कारण मोठी धावसंख्या असूनही इंग्लंडने झुंजार खेळी केली. 253 धावांचा पाठलाग करताना फक्त 7 धावा कमी पडल्या. इंग्लंडच्या पराभव करण्यात जसप्रीत बुमराहचं मोलाचा हातभार होता. त्याच्या भेदक गोलंदाजीशिवाय हा विजय शक्यच नव्हता असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. इंग्लंडचा फलंदाज जेकब बेथेलच्या 105 धावांच्या खेळीनंतरही टीम इंडियाने विजय मिळवला. सामन्याच्या शेवटी जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पंड्याने शानदार गोलंदाजी करत भारताला विजय मिळवून दिला. त्यामुळे पाकिस्तानच्या आजी माजी क्रिकेटपटूंची तोंड गप्प झाली आहेत. कारण या सामन्यापूर्वी माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू रशीद लतीफ, मोहम्मद अमीर आणि शाहिद आफ्रिदी यांनी भाकीत केले होते की, टीम इंडिया जिंकणार नाही. पण टीम इंडियाने विजय मिळवला आणि अंतिम फेरी गाठली.
टीम इंडियाने उपांत्य फेरीत विजय मिळवल्यानंतर शाहिद आफ्रीदीने पाकिस्तानी गोलंदाजांचे कान टोचले. त्याने जावई शाहिन शाह आफ्रिदीलाही खडे बोल सुनावले. शाहिद आफ्रिदी म्हणाला की, इतर संघांनी दबावाखाली कसे कामगिरी करावी याबद्दल टीम इंडियाकडून शिकले पाहिजे. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात जर चांगली गोलंदाजी केली असती तर उपांत्य फेरी गाठली असती, असं अफ्रिदीने सांगितलं. शाहिद आफ्रिदीने जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीचं कौतुक केलं. आफ्रिदीने बुमराहाच्या गोलंदाजीचं उदाहरण देत सांगितलं की, जर त्यांचा जावई शाहीन आफ्रिदीने असाच स्पेल टाकला असता तर पाकिस्तानने श्रीलंकेविरुद्ध उच्च नेट रन रेटसह उपांत्य फेरीत प्रवेश केला असता.
शाहिद आफ्रिदीने कौतुक केलं पण शेवटी पाकिस्तानी रंगही दाखवला. टीम इंडिया अंतिम फेरीत हरेल अशी आणखी एक भविष्यवाणी केली. न्यूझीलंडचा संघ टीम इंडियापेक्षा खूपच मजबूत आहे, असंही त्याने सांगितलं. तसं पाहिलं तर कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही ही म्हण आहे. ती शाहिद आफ्रिदीला लागू पडते. कारण आतापर्यंत त्याने भारताविरुद्ध जितकी गरळ ओकली त्याला भारतीय संघाने खेळातून प्रत्युत्तर दिलं आहे.