श्रेयस अय्यरच्या मागे शुक्लकाष्ठ, पाच वर्षात पाच कारणांमुळे राहिला क्रिकेटपासून दूर

श्रेयस अय्यरच्या मागे दुखापतीचं शुक्लकाष्ठ लागलं आहे. त्यामुळे फॉर्मात असूनही त्याचा काही एक फायदा होत नाही. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्याला गंभीर दुखापत झाली आणि आता दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी मुकण्याची शक्यता आहे.

श्रेयस अय्यरच्या मागे शुक्लकाष्ठ, पाच वर्षात पाच कारणांमुळे राहिला क्रिकेटपासून दूर
श्रेयस अय्यरच्या मागे शुक्लकाष्ठ, पाच वर्षात पाच कारणांमुळे राहिला क्रिकेटपासून दूर
Image Credit source: PTI
| Updated on: Nov 11, 2025 | 3:42 PM

श्रेयस अय्यर हा भारतीय क्रिकेटमधील एक चांगला फलंदाज आहे. मधल्या फळीत टीम इंडियाला आवश्यक असलेल्या फलंदाजाचे सर्व गुण त्याच्यात आहेत. मात्र गेल्या काही वर्षात त्याला दुखापतीचं ग्रहण लागलं आहे. ठरावीक कालावधीनंतर त्याला दुखापतीमुळे बाहेर बसावं लागत आहे. गेल्या पाच वर्षात असंच पाहायला मिळालं आहे. त्यामुळे त्याची घडी नीट बसण्यापू्र्वीच विस्कटत असल्याचं दिसत आहे. ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या वनडे मालिकेत त्याला गंभीर दुखापत झाली. इतकंच काय तर त्याला आयसीयूत भरती करण्याची वेळ आली होती. आता घरी आला असून त्यातून सावरत आहे. पण आता होणाऱ्या दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेला मुकण्याची शक्यता आहे. भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात 30 नोव्हेंबरपासून वनडे मालिका सुरू होत आहे. पण श्रेयस अय्यर अजूनही दुखापतीतून सावरत आहे. त्यामुळे त्याचं या मालिकेत खेळणं कठीण आहे. श्रेयस अय्यरला दुखापतीचं ग्रहण कधी कधी लागलं ते जाणून घ्या

ऑक्टोबर 2025 सिडनी वनडे मालिकेत दुखापत

भारत ऑस्ट्रेलिया वनडे मालिकेतून श्रेयस अय्यरने कमबॅक केलं होतं. पण या मालिकेत त्याला स्पिलिन दुखापत झाली आणि मैदान सोडावं लागलं. इतकंच काय तर थेट हॉस्पिटलमध्ये रवानगी झाली. खरं तर त्याचं संघात पुनरागमन उपकर्णधार म्हणून झालं होतं. पण पुन्हा एकदा दुखापतीने ग्रासलं आहे. त्यातून सावरण्यासाठी त्याला काही वेळ लागण्याची शक्यता आहे.

2021 मध्ये खांद्याच्या दुखापतीमुळे बाहेर

श्रेयस अय्यर आणि दुखापत यांची नकोशी युती 2021 पासून सुरु झाली आहे. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात पुण्यात त्याच्या खांद्याला दुखापत झाली होती. त्यामुळे आयपीएल 2021 स्पर्धेला मुकला होता.

2023 पाठदुखीचा त्रास

बॉर्डर गावस्कर 2023 स्पर्धेदरम्यान त्याच्या पाठीला दुखापत झाली आणि क्रिकेटच्या मैदानापासून दूर गेला. त्यानंतर एप्रिल महिन्यात त्याच्या पाठीवर शस्त्रक्रिया झाली. त्यानंतर आयपीएल स्पर्धा खेळू शकला नव्हता.

2024 मध्ये दोनदा दुखापतीमुळे बाहेर

2024 वर्षात पुन्हा एकदा पाठदुखाने डोकं वर काढलं होतं. त्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतून त्याने माघार घेतली. कारण पाठदुखीचा त्रास पुन्हा होण्याची भीती होती. त्यानंतर सप्टेंबर 2024 मध्ये क्रिकेटमधून ब्रेक घेतला होता. असं दुखापतीचं ग्रहण त्याच्या मागे लागलं होतं.