IND vs SA : दक्षिण अफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका या दोन खेळाडूंसाठी महत्त्वाची, एकाची तर जागा संकटात
भारत आणि दक्षिण अफ्रिका कसोटी मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिच्या दृष्टीने खूपच महत्त्वाची आहे. गुणतालिकेत दुसरं स्थान मिळवायचं असेल तर दोन्ही सामने जिंकणं भाग आहे. असं असताना दोन खेळाडूंसाठी ही मालिका खूपच महत्त्वाची असणार आहे.

भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेला 14 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन दक्षिण अफ्रिकेशी होणारा सामना वाटतो तितका सोपा नाही. त्यामुळे भारतीय संघाला ताकही फुंकून प्यावं लागणार आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर भारताने धडा घेतला असावा. त्यामुळे दक्षिण अफ्रिकेला कमी आखणं परवडणारं नाही. त्यात दक्षिण अफ्रिका ए संघाने अनऔपचारिक असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताला पराभूत केलं. या सामन्यात भारतीय संघात खेळणाऱ्या गोलंदाजांचा समावेश होता. त्यामुळे कर्णधार शुबमन गिल आणि हेड कोच गौतम गंभीर यांचं टेन्शन वाढलं आहे. असं असताना ही कसोटी मालिका दोन खेळाडूंसाठी महत्त्वाची असणार आहे. या सामन्यात साई सुदर्शन आणि कुलदीप यादव यांची खऱ्या अर्थाने परीक्षा आहे. कारण साई सुदर्शनला संघात जागा पक्की करायची तर धावा कराव्या लागतील. दुसरीकडे, कुलदीप यादवला आर अश्विनची जागा भरून काढावी लागणार आहे.
साई सुदर्शनचा कस लागणार
इंग्लंड दौऱ्यापासून साई सुदर्शन भारतीय कसोटी संघाचा भाग आहे. या कसोटी मालिकेत चेतेश्वर पुजाराच्या जागेसाठी साई सुदर्शनची लिटमस टेस्ट घेतली गेली. साई सुदर्शनला तिसऱ्या स्थानावर फलंदाजीसाठी संधी दिली गेली. त्याने तीन सामन्यांच्या सहा डावात 140 धावा केल्या. त्यानंतर वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतही तिसऱ्या स्थानावर संधी दिली गेली. वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत साई सुदर्शनला तिसरं स्थान पक्कं करण्याची संधी होती. पण एका अर्धशतकासह त्याने 133 धावा केल्या. तसेच दक्षिण अफ्रीका अ संघाविरूद्धच्या अनौपचारिक कसोटी मालिकेतील दोन्ही सामन्यात फक्त 84 धावा काढल्या. त्यामुळे आता साई सुदर्शनला शेवटची संधी आहे असं म्हंटलं वावगं ठरणार नाही. दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या कसोटीत त्याला चांगली कामगिरी करावीच लागणार आहे. साई सुदर्शनने 5 सामन्यांच्या 9 डावात 30.33 च्या सरासरीने 273 धावा केल्यात. यात दोन अर्धशतकांचा समावेश आहे.
कुलदीप यादव सात वर्षात खेळला फक्त 15 कसोटी
कुलदीप यादवला कसोटी संघात फार काही संधी मिळाली नाही. रवींद्र जडेजा आणि आर अश्विन जोडीमुळे त्याचा विचार फार काही केला गेला नाही. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 2018 मध्ये पदार्पण केलं होतं. त्याने 21.69 च्या सरासरीने 68 विकेट घेतल्या आहेत. कुलदीपला आता संघातून डावलण्याचा प्रश्नच येत नाह. आर अश्विनची जागा भरण्यासाठी त्याच्याकडे पाहिलं जात आहे. पण दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात झटपट विकेट घेण्याचं आव्हान असणार आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याने सर्वाधिक 12 विकेट घेतल्या होत्या. तशी कामगिरी करावी लागणार आहे.
