IND vs NZ : 87 धावांनी झालेल्या पराभवानंतर कॅप्टन श्रेयस अय्यर भडकला, पराभवाचं खापर कोणावर फोडलं? म्हणाला….
न्यूझीलंडकडून मिळालेल्या 260 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचा 87 धावांनी पराभव झाला. या पराभवानंतर श्रेयस अय्यरने गोलंदाजांच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त केली. नेमकी कोणती चूक झाली आणि पुढील सामन्यात भारतीय संघ कसा कमबॅक करणार?

न्यूझीलंडविरुद्धच्या चौथ्या टी-20 सामन्यात भारतीय संघाला 87 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. न्यूझीलंडने दिलेल्या 260 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाला 20 षटकांत 9 विकेट गमावत 172 धावाच करता आल्या. या मोठ्या पराभवानंतर भारतीय संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर चांगलाच नाराज झाला आहे. त्याने या पराभवाचं खापर गोलंदाजांच्या कामगिरीवर फोडत नाराजी व्यक्त केली. विशेषतः पॉवरप्लेमधील गोलंदाजी कमकुवत ठरल्याचे त्याने सामना संपल्यानंतर बोलताना स्पष्ट केले. दरम्यान, या पराभवानंतरही भारतीय संघाने पाच सामन्यांच्या टा20 मालिकेत 3-1 अशी आघाडी कायम ठेवली आहे.
पॉवरप्लेमधील गोलंदाजीवर नाराजी
सामना संपल्यानंतर बोलताना श्रेयस अय्यर म्हणाला, “निश्चितच, सुरुवातीला आमची गोलंदाजी थोडी कमकुवत होती. पॉवरप्लेमध्ये विशेषतः तिसऱ्या षटकापासून न्यूझीलंडच्या फलंदाजांनी जी लय पकडली, त्यानंतर काही गोलंदाजांनी पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ग्लेन फिलिप्सची खेळी असामान्य होती.”
ग्लेन फिलिप्सने खेळलेल्या काही फटक्यांचे श्रेयसने विशेष कौतुक केले. त्याने संपूर्ण मालिकेत सातत्यपूर्ण कामगिरी केली असून त्याच्याकडून शिकण्यासारखे बरेच काही असल्याचेही श्रेयसने सांगितले.
पुढील सामन्यासाठी रणनीती आखणार
पुढील सामन्याबाबत बोलताना श्रेयस म्हणाला की, आपण कुठे सुधारणा करू शकतो, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. हॅमिल्टनला जाण्यापूर्वी संघाला एक दिवसाची विश्रांती मिळणार आहे. या वेळेत पुढील सामन्याची रणनीती तयार केली जाईल. खेळाडूंना मैदानाच्या परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी थोडा वेळ लागतो. या मैदानाच्या सीमारेषा वेगळ्या होत्या आणि काही खेळाडू पहिल्यांदाच अशा मैदानावर खेळत होते.
सुरुवातीच्या तीन सामन्यांमध्ये भारतीय खेळाडूंनी शानदार कामगिरी केली होती. हा पराभव शिकण्याच्या प्रक्रियेचा एक भाग असल्याचे श्रेयसने सांगितले. पुढील सामन्यात सकारात्मक विचाराने मैदानात उतरून पुनरागमन करण्याचा विश्वासही त्याने व्यक्त केला.
या सामन्यातील टीम इंडियाची प्लेइंग 11
अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), इशान किशन, श्रेयस अय्यर (कर्णधार), टिळक वर्मा, नितीश कुमार रेड्डी, नमन धीर, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, मयंक यादव, प्रिन्स यादव