
सूर्यकुमार यादव याला टी 20 आशिया कप 2025 स्पर्धेत फलंदाज म्हणून त्याच्या लौकीकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. मात्र सूर्याने कर्णधार म्हणून पहिल्याच आशिया कप स्पर्धेत अविस्मरणीय कामगिरी केली. सूर्याने आपल्या नेतृत्वात टीम इंडियाला आशिया चॅम्पियन केलं. भारताने पारंपरिक आणि कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला पराभूत करत नवव्यांदा आशिया कप जिंकण्याचा विक्रम केला. भारताने यासह या स्पर्धेतील आपला दबदबा कायम ठेवला. त्यानंतर आता टीम इंडिया आपल्या पुढील आव्हानासाठी सज्ज झाली आहे.
टीम इंडिया टी 20 नंतर टेस्ट क्रिकेट खेळणार आहे. आशिया कप जिंकल्याचा आनंद असतानाच काही तासांनी कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. टीम इंडिया मायदेशात वेस्ट इंडिज विरुद्ध 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. उभयसंघात 2 ते 14 ऑक्टोबर दरम्यान या मालिकेचं आयोजन करण्यात आलं आहे. निवड समितीने या मालिकेसाठी आशिया कप स्पर्धेतील 15 पैकी फक्त 4 खेळाडूंनाच संधी दिली आहे. त्यामुळे इतर खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांसाठी प्रतिक्षा करावी लागणार आहे.
शुबमन गिल, अक्षर पटेल, कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराह या चौघांनाच विंडीज विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी संधी मिळाली आहे. या 11 पैकी फक्त सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पंडया हे दोघेच कसोटी क्रिकेट खेळले आहेत. तर इतर 9 खेळाडूंचं आतापर्यंत कसोटी पदार्पणही झालेलं नाही.
या 9 खेळाडूंना आतापर्यंत भारताचं एकदिवसीय आणि टी 20i क्रिकेटमध्ये प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे. मात्र हे 9 खेळाडू एकदिवसीय आणि टी 20i संघातील नियमित सदस्य आहेत. या 9 खेळाडूंमध्ये सू्र्या-हार्दिक व्यतिरिक्त अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, शिवम दुबे, संजू सॅमसन, हर्षित राणा, रिंकू सिंह, अर्शदीप सिंह, वरुण चक्रवर्ती आणि जितेश शर्मा यांचा समावेश आहे.
दरम्यान टीम इंडियाची आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2025-2027 या साखळीतील विंडीज विरुद्धची ही पहिली आणि एकूण दुसरी मालिका असणार आहे. तसेच कॅप्टन म्हणून शुबमन गिल याची मायदेशातील पहिलीच मालिका असणार आहे.
शुबमनच्या नेतृत्वात भारताने इंग्लंड दौऱ्यातील 5 सामन्यांची मालिका 2-2 ने बरोबरीत राखली होती. त्यामुळे आता टीम इंडियाचा मायदेशात विंडीज विरुद्ध WTC 2025-2027 या साखळीतील आपली पहिली मालिका जिंकण्याचा प्रयत्न असणार आहे. यात शुबमनसेनेला किती यश येणार हे निकालानंतरच स्पष्ट होईल.