IND vs WI : दुखापतीमुळे दुसरा झटका, आणखी एक खेळाडू कसोटी मालिकेतून बाहेर, टीम अडचणीत
India vs West Indies Test Series 2025: टीम इंडिया विरुद्ध वेस्ट इंडिज कसोटी मालिकेला 2 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेआधीच दुखापतीने 2 खेळाडूंची विकेट काढली आहे.

टीम इंडियाने आशिया कप 2025 स्पर्धेत सलग 7 सामने जिंकत नवव्यांदा चॅम्पियन होण्याची कामगिरी केली. भारतीय संघाने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात अंतिम सामन्यात पाकिस्तानवर मात करत टी 20 आशिया चॅम्पियन होण्याचा मान मिळवला. त्यानंतर आता क्रिकेट चाहत्यांना कसोटी क्रिकेटचा थरार अनुभवयाला मिळणार आहे. भारतीय संघ मायदेशात वेस्ट इंडिज विरुद्ध 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. मात्र त्याआधी मोठी बातमी समोर आली आहे. वेगवान आणि मॅचविनर गोलंदाजाला दुखापतीमुळे बाहेर व्हावं लागल्याने टीमच्या अडचणीत वाढ झाली आहे.
टीम इंडिया विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी मालिकेला 2 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. मालिकेतील सलामीचा सामना हा अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. मात्र सामन्याच्या 3 दिवसांआधी वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज अल्झारी जोसेफ याला दुखापतीमुळे या मालिकेतून बाहेर व्हावं लागलं आहे. विंडीज क्रिकेट बोर्डाने याबाबतची माहिती दिली आहे.
अल्झारीला नक्की काय झालं?
अल्झारी याला लोअर बॅक अर्थात कंबरेच्या खालील भागात त्रास जाणवत असल्याने या मालिकेत खेळता येणार नाहीय. अल्झारी या मालिकेत नसल्याने विंडीजच्या अडचणीत वाढ झाली आहे. अल्झारी विंडीजच्या अनुभवी गोलंदाजांपैकी एक आहे. त्यामुळे विंडीजला अल्झारीच्या अनुभवाचा फायदा झाला असता. मात्र आता विंडीजला अल्झारीशिवाय खेळावं लागणार आहे.
अल्झारीला पाठीत त्रास जाणवू लागला. त्यामुळे अल्झारीला नक्की काय झालंय हे जाणून घेण्यासाठी आवश्यक चाचण्या करण्यात आल्या. या चाचण्यांमधून अल्झारीच्या जुन्या दुखापतीने पुन्हा डोकं वर काढल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे अल्झारीला या मालिकेतून बाहेर व्हावं लागलंय, अशी माहिती विंडीज क्रिकेट बोर्डाकडून देण्यात आली आहे.
अल्झारीच्या जागी कुणाला संधी?
अल्झारीच्या जागी विंडीज संघात जेडाया ब्लेड्स याचा समावेश करण्यात आला आहे. जेडाया ब्लेड्स सध्या नेपाळ विरुद्ध टी 20i मालिकेत खेळत आहेत. जेडाया या टी 20i मालिकेनंतर कसोटी संघासह जोडला जाणार आहे. जेडाया ब्लेड्स याने आतापर्यंत विंडीजचं 3 एकदिवसीय आणि 4 टी 20i सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. तसेच जेडाया 13 फर्स्ट क्लास सामने खेळला आहे.
शामर जोसेफही आऊट
अल्झारी आऊट झाल्याने विंडीजला दुहेरी झटका लागला आहे. काही दिवसांआधी शामर जोसेफ यालाही दुखापतीमुळे टीम इंडिया विरूद्धच्या कसोटी मालिकेतून बाहेर व्हावं लागलं. शामरच्या जागी जोहान लेन याचा समावेश करण्यात आला आहे.
विंडीजला कसोटी मालिकेआधी दुसरा झटका
Squad Update 🚨
Alzarri Joseph has been ruled out of the upcoming test series against India due to a lower back injury.
After complaints of discomfort, scans revealed a degeneration of the previously resolved lower back injury. pic.twitter.com/k4DfzLb0e7
— Windies Cricket (@windiescricket) September 29, 2025
टीम इंडियाबाबत थोडक्यात
दरम्यान विंडीज विरूद्धच्या मालिकेत शुबमन गिल भारताचं नेतृत्व करणार आहे. तर रवींद्र जडेजा याच्याकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. नियमित उपकर्णधार आणि विकेटकीपर ऋषभ पंत याला इंग्लंड दौऱ्यात झालेल्या दुखापतीमुळे विंडीज विरूद्धच्या मालिकेला मुकवं लागलं आहे. त्यामुळे जडेजा उपकर्णधार म्हणून खेळणार आहे. तर ध्रुव जुरेल याचा विकेटकीपर म्हणून समावेश करण्यात आला आहे. मालिकेतील पहिला सामना हा अहमदाबाद तर दुसरा आणि अंतिम सामना हा दिल्लीत होणार आहे.
