Joe Root याचा कसोटीनंतर वनडेतही धमाका, श्रीलंकेविरुद्ध महारेकॉर्ड, दिग्गजाला पछाडलं

Joe Root Surpassed Kevin Pietersen : जो रुट याने श्रीलंकेविरुद्ध 220 धावांचा पाठलाग करताना सर्वाधिक 75 धावांची खेळी केली. रुटने त्याआधी बॉलिंगनेही कमाल केली. रुटला यासाठी मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.

Joe Root याचा कसोटीनंतर वनडेतही धमाका, श्रीलंकेविरुद्ध महारेकॉर्ड, दिग्गजाला पछाडलं
Joe Root England
Image Credit source: Icc X account
| Updated on: Jan 25, 2026 | 10:12 AM

इंग्लंडचा अनुभवी फलंदाज आणि कसोटीत सर्वाधिक धावा करणारा सक्रीय फलंदाज म्हणजे जो रुट. जो रुट गेल्या काही वर्षांपासून सातत्याने कसोटी क्रिकेटमध्ये खोऱ्याने धावा करत आहे. रुटने या दरम्यान सचिन तेंडुलकरचे असंख्य विक्रम मोडीत काढत इतिहास घडवला आहे. रुटने फक्त कसोटीच नाही तर एकदिवसीय क्रिकेटमध्येही आपली छाप सोडली आहे. रुटने श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऐतिहासिक अशी कामगिरी करत आपल्याच दिग्गज आणि माजी सहकाऱ्याला पछाडलं आहे.

इंग्लंड क्रिकेट टीम सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. उभयसंघात टी 20i आणि एकदिवसीय मालिका नियोजित आहे. तर सध्या एकदिवसीय मालिकेचा थरार रंगत आहे. श्रीलंकेने या एकदिवसीय मालिकेत विजयी सलामी दिली. त्यानंतर इंग्लंडने जोरदार कमबॅक करत पहिल्या पराभवाची परतफेड केली.

इंग्लंडने शनिवारी 24 जानेवारीला कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये श्रीलंकेला पराभूत केलं. इंग्लंडने हा सामना 5 विकेट्सने आपल्या नावावर केला. इंग्लंडला विजयी करण्यात जो रुट याने निर्णायक योगदान दिलं. रुटने 75 धावांची खेळी केली. तसेच रुटने त्याआधी श्रीलंकेच्या 2 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. रुटला या अष्टपैलू कामगिरीसाठी सामनावीर अर्थात मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आलं.

रुटने सामनावीर पुरस्कार जिंकताच मोठा विक्रम आपल्या नावावर केला. रुट इंग्लंडसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा मॅन ऑफ द मॅच पुरस्कार जिंकणारा खेळाडू ठरला. रुटने याबाबतीत इंग्लंडचा माजी फलंदाज केविन पीटरसन याला मागे टाकलं.

इंग्लंडसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक potm पुरस्कार विजेते खेळाडू

जो रूट : 27
केविन पीटरसन : 26
जोस बटलर : 24
जॉनी बेयरस्टो : 22
इयन मॉर्गन आणि बेन स्टोक्स : 21

जो रुटची मॅन ऑफ द मॅच पुरस्कार जिंकण्याची ही 27 वी वेळ ठरली. तर पीटरसन याने 26 वेळा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सामनावीर होण्याचा बहुमान मिळवला होता.

श्रीलंका-इंग्लंड तिसरा आणि निर्णायक सामना कधी?

दरम्यान श्रीलंका विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसरा आणि अंतिम एकदिवसीय सामना हा मंगळवारी 27 जानेवारीला होणार आहे. उभयसंघातील मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. त्यामुळे आता मंगळवारी कोणता संघ दुसऱ्या सामन्यासह मालिका जिंकणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.