SMAT 2025 HAR vs JHA: अंतिम सामन्यात इशान किशनचा झंझावात, शतकी खेळीसह नोंदवला विक्रम

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2025 स्पर्धेच्या अंतिम फेरीत हरियाणा आणि झारखंड हे संघ आमनेसामने आले आहेत. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हरियाणाने जिंकला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. पण असं असलं तरी झारखंडचा कर्णधार इशान किशनने खणखणीत शतक ठोकत मोठी धावसंख्या उभारण्यास मदत केली आहे.

SMAT 2025 HAR vs JHA: अंतिम सामन्यात इशान किशनचा झंझावात, शतकी खेळीसह नोंदवला विक्रम
अंतिम सामन्यात इशांत किशनचा झंझावात, शतकी खेळीसह नोंदवला विक्रम
Image Credit source: BCCI/Video Grab
| Updated on: Dec 18, 2025 | 6:07 PM

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2025 स्पर्धेच्या जेतेपदासाठी झारखंड आणि हरियाणा हे संघ आमनेसामने आले आहेत. पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर हा सामना होत आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हरियाणाच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. झारखंडकडून इशान किशन आणि विराट सिंग ही जोडी मैदानात उतरली. पण पहिल्याच षटकात झारखंडला धक्का बसला. विराट सिंग अवघ्या 2 धावांवर तंबूत परतला. त्यामुळे झारखंडवर दबाव वाढला. पण अनुभवी इशान किशनने हा दबाव झिडकारून संघाला त्यातून बाहेर काढलं. इशान किशनने आक्रमक खेळी करत हरियाणाच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. त्याने एकूण 16 चौकार आणि षटकार मारले. इशान किशनने 49 चेंडूत 10 षटकार आणि 6 चौकार मारत 101 धावा केल्या. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट हा 206.12 चा होता.

इशान किशनने या शतकी खेळीकड सय्यद मुश्ताक अली टी20 ट्रॉफीत एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. यापूर्वी कोणत्याही कर्णधाराने या स्पर्धेच्या अंतिम फेरीत शतक ठोकलं नव्हतं. आता हा विक्रम इशान किशनच्या नावावर झाला आहे. इशान किशनने षटकार मारून शतक साजरं केलं. इशान किशनने स्पर्धेत पाचवे शतक झळकावून सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या इतिहासात सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या अभिषेक शर्माच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. गेल्या महिन्यात त्रिपुराविरुद्ध 50 चेंडूत नाबाद 113 धावा केल्या होत्या. या स्पर्धेतील इशान किशनचे दुसरे शतक होते.

देशांतर्गत टी20 स्पर्धेत इशान किशनने जबरदस्त फॉर्मात असल्याचं दाखवून दिलं आहे. दहा डावांमध्ये197.32च्या स्ट्राईक रेटने 517 धावा करून सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत आघाडीवर आहे. या खेळीसह इशान किशनने पुन्हा एकदा टीम इंडियाचं दार ठोठावलं आहे. गेल्या वर्षभरापासून इशान किशन टीम इंडियात पदार्पणसाठी धडपड करत आहे. मात्र त्याला संधी मिळताना दिसत नाही.