T20i World Cup 2026 : दुखापतीला आणखी 1 विकेट, मॅचविनर खेळाडू वर्ल्ड कप स्पर्धेतून आऊट

Icc T20i World Cup 2026 Injury : आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत साखळी फेरीचा थरार सुरु आहे. अशात एका खेळाडूला दुखापतीमुळे बाहेर व्हावं लागलं आहे. कोण आहे तो दुर्देवी खेळाडू? जाणून घ्या.

T20i World Cup 2026 : दुखापतीला आणखी 1 विकेट, मॅचविनर खेळाडू वर्ल्ड कप स्पर्धेतून आऊट
Arshdeep Singh and Wanindu Hasaranga
Image Credit source: PTI
| Updated on: Feb 10, 2026 | 7:06 PM

आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. यजमान टीम इंडिया आणि श्रीलंका या दोन्ही संघांनी विजयी सुरुवात केलीय. तसेच इतर प्रमुख संघांनीही विजयी सलामी दिली. पाकिस्ताननेही आयसीसी टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत भूमिका बदलत 15 फेब्रुवारीला टीम इंडिया विरुद्ध खेळणार असल्याचं जाहीर केलं. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना हायव्होल्टेज सामना पाहायला मिळणार आहे. तर दुसर्‍या बाजूला या स्पर्धेतून दुखापतीमुळे बाहेर होण्याची मालिका सुरुच आहे.

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज हर्षित राणा याला दुखापतीमुळे या 10 व्या टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेतून बाहेर व्हावं लागलं. त्यामुळे हर्षितच्या जागी मोहम्मद सिराज याचा समावेश करण्यात आला. त्याआधी ऑस्ट्रेलियाचा प्रमुख गोलंदाज जोश हेझलवूड याचाही दुखापतीने गेम केला. आता आणखी एका खेळाडूला दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर व्हावं लागलंय.

बॅटिंग ऑलराउंडर वानिंदु हसरंगा याला दुखापत

सहयजमान श्रीलंका टीममधील बॅटिंग ऑलराउंडर आणि अनुभवी खेळाडू वानिंदू हसरंगा याला दुखापतीमुळे साखळी फेरीतूनच वर्ल्ड कप स्पर्धेतून बाहेर व्हावं लागलंय. वानिंदू हसरंगा याला 8 फेब्रुवारीला आयर्लंड विरुद्ध पहिल्या सामन्यादरम्यान दुखापत झाली होती. मात्र वानिंदुने दुखापतीनंतरही 3 विकेट्स घेत श्रीलंकेला विजयी करण्यात योगदान दिलं होतं.

वानिंदुला काय झालं?

वानिंदुच्या मांडीच्या स्नायूंना (हॅमस्ट्रिंग) झालेल्या दुखापतीमुळे उर्वरित स्पर्धेतून बाहेर व्हावं लागलं आहे. वानिंदुला हॅमस्ट्रिंग झाल्याचं मंगळवारी 10 फेब्रुवारीला करण्यात आलेल्या एमआरआय स्कॅन रिपोर्टमधून स्पष्ट झालं. वानिंदुला झालेली ही दुखापत गंभीर स्वरुपाची असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र अद्याप आयसीसी तसेच श्रीलंका क्रिकेट बोर्डाकडून याबाबतची कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

वानिंदुच्या जागी कुणाला संधी मिळणार?

आता वानिंदुच्या दुखापतीनंतर श्रीलंका संघात त्याच्या जागी ऑलराउंडर दुषण हेमंथा याला संधी देण्यात येऊ शकते.

वानिंदुची टी 20I कारकीर्द

वानिंदु हसरंगा याने आतापर्यंत श्रीलंकेचं एकूण 95 टी 20i सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. वानिंदुने या 95 मधील 93 डावांमध्ये एकूण 154 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच वानिंदु टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजंच्या यादीत दुसऱ्या स्थानी विराजमान आहे.

श्रीलंकेचा दुसरा सामना कधी?

दरम्यान श्रीलंका या मोहिमेतील आपला दुसरा सामना हा 12 फेब्रुवारीला खेळणार आहे. श्रीलंका या सामन्यात ओमान विरुद्ध भिडणार आहे. हा सामना पल्लेकेले स्टेडियममध्ये होणार आहे.