
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेचा थरार 7 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. भारत आणि अमेरिका यांच्यात पहिली लढत होणार आहे. भारताच्या वर्ल्डकप स्पर्धेला या सामन्यापासून सुरूवात होणार आहे. भारताच्या गटात अमेरिका, पाकिस्तान, नामिबिया आणि नेदरलँड हे संघ आहेत. त्यामुळे 12 फेब्रुवारीला नामिबिया, 15 फेब्रुवारीला पाकिस्तान आणि 18 फेब्रुवारीला नेदरलँडविरुद्ध लढत होणार आहे. त्यामुळे सुपर 8 फेरीत भारत पोहोचणार हे या गटावरून स्पष्ट होत आहे. दुसरीकडे, गतविजेता भारत यंदाही जेतेपदाचा दावेदार आहे. असं असताना भारताने या स्पर्धेपूर्वी ऑस्ट्रेलियाला डिवचलं आहे. कर्णधार सूर्यकुमार यादवने नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध अंतिम सामना खेळायचा आहे अशी इच्छा व्यक्त केली आहे. टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पाकिस्तान पोहोचू शकलं नाही तर हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होईल.
टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या वेळापत्रकाची घोषणा होताच अँकर जतिन सप्रूने सूर्यकुमार यादवला अंतिम फेरीबाबतचा प्रश्न विचारला. त्याने सूर्यकुमार यादवला विचारलं की अंतिम सामना कोणासोबत खेळू इच्छितो. तेव्हा सूर्यकुमार यादवने सांगितलं की, ‘टी20 वर्ल्डकप अंतिम सामना, नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद, ऑस्ट्रेलिया’ सूर्यकुमार यादवने अशी इच्छा व्यक्त केली तेव्हा स्टेजवर दोन वर्ल्डकप विजेते कर्णधार रोहित शर्मा आणि हरमनप्रीत कौर होते. दरम्यान, 2023 वनडे वर्ल्डकप स्पर्धेचा अंतिम सामना याच मैदानात झाला होता. तेव्हा ऑस्ट्रेलियाने भारताला पराभूत केलं होतं. या संघात सूर्यकुमार यादवही होता.
सूर्यकुमार यादवने ग्रुपमधील संघांबाबतही आपलं मत व्यक्त केलं. ‘ग्रुप चांगला वाटत आहे. ठीकठाक आहे. आम्ही चांगल्या ठिकाणी सामने खेळणार आहोत. यात मुंबई, दिल्ली आणि अहमदाबाद आहे. जर 15 तारखेच्या सामन्याबाबत बोलत असाल तर आम्ही नुकतंच त्यांच्यासोबत खेळलो आहोत. आम्ही चांगली कामगिरी केली आहे. तुम्ही पाहीलं असेल की आमचं क्रिकेटवर पूर्ण लक्ष होतं. दुसऱ्या कोणत्याही गोष्टीकडे पाहणं आम्ही टाळलं. पण हा.. हा एक चांगला सामना होईल. खेळाडू कायम भारत पाकिस्तान सामन्यासाठी तयार असतात. जेव्हा मैदानात जातात तेव्हा चांगलं करतात. ‘