T20 WC 2026, SA vs NZ: धोनीचा नकोसा विक्रम अखेर क्विंटन डी कॉकने मोडला, असं घडलं या सामन्यात

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या 24व्या सामन्यात न्यूझीलंड आणि दक्षिण अफ्रिका हे तगडे संघ आमनेसामने आले होते. त्यामुळे हा सामना जिंकणं तसं सोपं नव्हतं. पण दक्षिण अफ्रिकेने 7 गडी राखून विजय मिळवला. या सामन्यात काही विक्रम नोंदवले गेले. चला जाणून घेऊयात त्याबाबत...

T20 WC 2026, SA vs NZ: धोनीचा नकोसा विक्रम अखेर क्विंटन डी कॉकने मोडला, असं घडलं या सामन्यात
धोनीचा नकोसा विक्रम अखेर क्विंटन डी कॉकने मोडला, असं घडलं या सामन्यात
Image Credit source: Proteas Men Twitter
| Updated on: Feb 14, 2026 | 10:53 PM

टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील 24 व्या सामन्यात दक्षिण अफ्रिकेने न्यूझीलंडला 7 गडी राखून मात दिली. या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकताच कर्णधार एडन मार्करमने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रात्रीचं दव फॅक्टर लक्षात घेऊन त्याने हा निर्णय घेतला होता. अखेर हा निर्णय पथ्यावर पडला. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 7 गडी गमवून 175 धावा केल्या आणि विजयासाठी 176 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान दक्षिण अफ्रिकेने 3 गडी गमवून 17.1 षटकात पूर्ण केलं. या विजयासह दक्षिण अफ्रिकेने सुपर 8 फेरीतील स्थान पक्कं केलं आहे. या सामन्यात कर्णधार एडन मार्करमच्या खेळीने विजयात हातभार लावला. एडन मार्करम पहिल्या चेंडूपासून खेळपट्टीवर जम बसवून राहिला आणि विजय मिळवून देईपर्यंत खेळला. त्याने 44 चेंडूत नाबाद 86 धावांची खेळी केली. एडन मार्करमने 8 चौकार आणि 4 षटकार मारले.

क्विंटन डी कॉकने मोडला धोनीचा नकोसा विक्रम

दक्षिण अफ्रिकेच्या क्विंटन डी कॉकने विकेटकीपर फलंदाज महेंद्रसिंह धोनीच्या नावावर असलेला नकोसा विक्रम मोडला. या सामन्यात त्याने 14 चेंडूत 3 चौकार आणि 1 षटकार मारत 20 धावा करून बाद झाला. त्याला लॉकी फर्ग्युसनने त्रिफळाचीत केलं. बाद होताच क्विंटन नकोशा यादीत महेंद्रसिंह धोनीच्या पुढे निघून गेला आहे. टी20 वर्ल्डकप स्पर्धेत क्विंटन डी कॉक बाद होण्याची ही 33वी वेळ होती. यापूर्वी महेंद्रसिंह धोनीसह संयुक्तरित्या एकाच स्थानावर होते. महेंद्रसिंह धोनी टी20 वर्ल्डकपमध्ये 32वेळा बाद झाला आहे. तर पाकिस्तानचा कामरान अकमल 30, तर देनेश रामदीन 27 वेळा बाद झाला आहे.

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत दक्षिणअफ्रिकेने भारताच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. टी20 वर्ल्डकप स्पर्धेत एकाच प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध एकही सामना न गमवता जिंकणाऱ्या संघाच्या यादीत दक्षिण अफ्रिका आली आहे. दक्षिण अफ्रिकेने 5 सामने जिंकण्याची किमया साधली आहे. दक्षिण अफ्रिकेने न्यूझीलंडला 5 वेळा पराभूत केलं आहे. तर भारताने बांगलादेशला 5 वेळा नमवलं आहे. म्हणजेच बांगलादेशविरुद्ध भारताने टी20 वर्ल्डकप स्पर्धेत एकही सामना गमावलेला नाही. या यादीत ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान संयुक्तरित्या पहिल्या स्थानावर आहेत. या दोन्ही संघांनी बांगलादेशला सहावेळा पराभूत केलं आहे.