T20 World Cup : रोहितला भिडणं बांगलादेशच्या तंजीमला पडलं महागात, आयसीसीने केली अशी कारवाई
टी20 वर्ल्डकप स्पर्धेत बांगलादेशनं उलटफेर करत सुपर 8 फेरी गाठली आहे. बांगलादेशचा संघ भारताचाच गटात असून दोन्ही संघ 22 जूनला भिडणार आहे. तत्पूर्वी बांगलादेशच्या तंजीमवर कारवाईचा बडगा उगारला गेला आहे. आयसीसीच्या आचारसंहितेच्या कलम 2.12 चं उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.

बांगलादेशने टी20 वर्ल्डकप स्पर्धेत उलटफेरत करत श्रीलंकेसारख्या दिग्गज संघाला बाहेर केलं आहे. गट ड मधून दक्षिण अफ्रिकेसोबत सुपर 8 फेरीत स्थान मिळवण्यात यश मिळवलं आहे. दरम्यान बांगलादेशचा वेगवान गोलंदाज तंजीम हसन साकिबला आयसीसीने दणका दिला आहे. नेपाळचा कर्णधार रोहित पॉडेलला भिडणं त्याला चांगलंच महागात पडलं आहे. 16 जूनला नेपाळ बांगलादेश यांच्यात सामना पार पडला. या सामन्यात तंजीमने आयसीसी आचारसंहितेचं उल्लंघन केलं. नेपाळच्या डावातील तिसऱ्या षटकात हा प्रकार घडला. बांगलादेशकडून तंजीम हसन साकिब हा गोलंदाजी करत होता. पहिल्या पाच चेंडूवर एकही धाव आली नाही. इतकंच काय तर तंजीमने दोन विकेट घेत नेपाळला बॅकफूटवर ढकललं होतं. या षटकाचा शेवटचा चेंडू रोहितने बचावात्मक खेळला. तंजीमने हे षटक निर्धाव टाकत दोन गडी बाद केले. त्यामुळे जोशात असलेला तंजीमला हवा डोक्यात गेली. नेपाळचा कर्णधार रोहितच्या जवळ गेला आणि त्याला रागाने बघू लागला. दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली. दोघांचा पारा वाढल्याचं पाहून इतर खेळाडूंनी मध्यस्थी केली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला. आता आयसीसीने या प्रकरणी तंजीमला इंगा दाखवला आहे.
आयसीसीने स्पष्ट केलं की, “आयसीसीच्या आचारसंहितेच्या स्तर 1 चं उल्लंघन केल्याप्रकरणी तंजीमवर कारवाई केली आहे. ही घटना नेपाळच्या डावातील तिसऱ्या षटकात घडली. तंजीमने षटकाचा शेवटचा चेंडू टाकून नेपाळचा कर्णधार रोहित पॉडेलकडे रागाने पाहू लागला होता. तसेच अंगावर जाण्याचाही प्रयत्न केला.’ तंजीम विरोदात आचारसंहिता कलम 2.12चं उल्लंघन केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. तसेच वेगवान गोलंदाजाच्या वागणुकीत एक डिमेरिट पॉइंट दिला गेला आहे. गेल्या 24 महिन्यातील त्याचा हा पहिलाच गुन्हा आहे.
View this post on Instagram
दरम्यान बांगलादेशने नेपाळसमोर विजयासाठी 106 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण नेपाळचा संघ 19.2 षटकात सर्व बाद 85 धावा करू शकला. बांगलादेशने नेपाळवर 21 धावांनी विजय मिळवला. आता बांगलादेशचा सुपर 8 फेरीत भारत, अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलियाशी सामना होणार आहे. आता या फेरीत बांगलादेश काय उलटफेर करते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
दोन्ही संघांनी प्लेइंग इलेव्हन
नेपाळ (प्लेइंग इलेव्हन): कुशल भुर्तेल, आसिफ शेख (विकेटकीपर), रोहित पौडेल (कर्णधार), अनिल साह, दीपेंद्र सिंग आयरी, कुशल मल्ला, गुलसन झा, सोमपाल कामी, संदीप जोरा, संदीप लामिछाने, अविनाश बोहरा.
बांगलादेश (प्लेइंग इलेव्हन): तनझिद हसन, नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), लिटन दास (विकेटकीपर), शकीब अल हसन, तौहिद ह्रदोय, महमुदुल्ला, जाकेर अली, रिशाद हुसेन, तस्किन अहमद, तनझिम हसन साकिब, मुस्तफिजुर रहमान.
