IND vs PAK Rain: पावसाचं तिसऱ्यांदा विघ्न, महामुकाबला होणार की नाही? मोठी अपडेट समोर?
India vs Pakistan Rain: टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान महामुकाबल्यात पावसाने दुसऱ्यांदा खोडा घातला आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांचा हिरमोड झाला आहे.

आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील 19 व्या सामन्यात ए ग्रुपमधील टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान दोन्ही संघ आमनेसामने आहेत. सामन्याला नियोजित वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरुवात होणं अपेक्षित होतं. तर 7 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार होता. मात्र टॉसआधी पावसाने एन्ट्री घेतली. पावसामुळे टॉसला विलंब झाला. त्यानंतर पावसाच्या विश्रांतीनंतर टॉस झाला. मात्र टॉसनंतर पुन्हा पावसाने एन्ट्री घेतली. त्यामुळे सामन्याच्या वेळेत पुन्हा एकदा बदल झाला आहे.
टीम इंडिया-पाकिस्तान महामुकाबल्यासाठी क्रिकेट चाहत्यांना कायम प्रतिक्षा असते. या सामन्यासाठी स्टेडियम आणि असंख्य क्रिकेट चाहते उत्सुक होते. नासाऊ काऊंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये याआधी झालेल्या 4 सामन्यांमध्ये टॉस फॅक्टर महत्त्वाचा ठरला. त्यामुळे टीम इंडिया-पाकिस्तान सामन्याच्या टॉसकडे सर्वांचंच लक्ष होतं. संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटं झाले, मात्र पावसामुळे टॉसला विलंब झाल्याचं कळवण्यात आलं. त्यानंतर 7 वाजून 45 मिनिटांनी पंचांनी खेळपट्टीची पाहणी केली.
पंचांच्या पाहणीनंतर टॉस 8 वाजता तर सामन्याला 8 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार असल्याचं सांगण्यात आलं. त्यानुसार टॉस झाला. आता क्रिकेट चाहते साडे आठ वाजण्याची वाट पाहत होते. मात्र त्यात पुन्हा पावसाने खोडा घातला. त्यामुळे पुन्हा सामन्याला विलंब झाला. त्यानंतर 8 वाजून 50 मिनिटांनी सामना सुरु होणार असल्याचं सांगण्यात आलं. अखेर सामन्याला सुरुवात झाली. रोहित शर्मा आणि विराट कोहली ही सलामी जोडी मैदानात आली. मात्र 1 ओव्हरचा खेळ झाला आणि पुन्हा पावसाने एन्ट्री घेतली आहे. पावसाने काही मिनिटं बॅटिंग केली आणि पुन्हा विश्रांती घेतली आहे. आता मिळालेल्या माहितीनुसार सामन्याला पुन्हा 9 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन: रोहित शर्मा (कॅप्टन), विराट कोहली, ऋषभ पंत (विकटेकीपर), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंग
पाकिस्तान प्लेइंग ईलेव्हन: बाबर आझम (कॅप्टन), मोहम्मद रिझवान, उस्मान खान, फखर जमान, शादाब खान, इफ्तिखार अहमद, इमाद वसीम, शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ, नसीम शाह आणि मोहम्मद अमीर.
